Dailyhunt
शीव रुग्णालयात पोलिसाला मारहाण प्रकरणी दोघांची निर्दोष मुक्तता, सत्र न्यायालयाचा सरकारी पक्षाला झटका

शीव रुग्णालयात पोलिसाला मारहाण प्रकरणी दोघांची निर्दोष मुक्तता, सत्र न्यायालयाचा सरकारी पक्षाला झटका

सामना 4 days ago

शीव रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या पोलील हवालदाराला मारहाण करणाऱ्या दोघा आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती आणि सबळ पुराव्यांअभावी सत्र न्यायालयाने दोघा आरोपींना दोषमुक्त केले.

सत्र न्यायालयाच्या या निर्णयामुळे सरकारी पक्षाला मोठा झटका बसला आहे. शेखर समुद्रपांडी नाडर आणि अक्षय प्रकाश चव्हाण अशी दोघा आरोपींची नावे आहेत.

16 मार्च 2016 रोजी शीव रुग्णालयातील कॅज्युअल्टी विभागात शेखर समुद्रपांडी नाडर आणि अक्षय प्रकाश चव्हाण या दोघांनी गोंधळ घातला होता. यावेळी तेथे कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार निलेश सुर्वे हे मध्यस्थी करण्यास गेले. यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण करत सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचा दावा सरकारी पक्षाने केला होता. याप्रकरणी सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याबाबत कोणतेही ठोस पुरावे सादर केले नसल्याचे सत्र न्यायालयाने नमूद करत अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. आर. ए. शेख यांनी आरोपींच्या निर्दोष मुक्ततेचे आदेश दिले. निलेश सुर्वे हे त्या दिवशी प्रत्यक्ष ड्युटीवर होते की नाही, याचे समाधानकारक कागदोपत्री पुरावे पोलीस सादर करू शकले नाहीत. तसेच घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे असूनही तपास अधिकाऱ्यांनी त्यांचे फुटेज सादर केले नाही. त्यामुळे गुन्ह्याच्या सत्यतेवरच शंका निर्माण होत आहे. तसेच सरकारी डॉक्टर आणि सुरक्षा रक्षकांच्या जबाबातही मोठी विसंगती दिसून येते, असे निरिक्षण नोंदवत न्यायालयाने दोन्ही आरोपींना संशयाचा लाभ देत निर्दोष मुक्त केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana