Sunday, 07 Mar, 5.05 am सामना

ठळक
शिवमंदिरांच्या राज्यात - मध्यमेश्वराचं शिवसाम्राज्य

>> नीती मेहेंदळे

संगमेश्वर मंदिर पाहून खानगावात येऊन बंधाऱयाखालील उजव्या हाताच्या नदीपात्रातील रस्त्याने भल्यामोठय़ा गोदापात्रात एक टेकडावर असलेले एक मंदिर दिसते. हेच ते गंगा मध्यमेश्वराचं मंदिर. या मंदिराला एका उंच तटबंदीची बांधणी आहे. त्यामुळे पर्जन्यकाळात नदीच्या पाण्यापासून मंदिराचे संरक्षण होत असावे. नदीपात्रात मधोमध हे मंदिर असल्याने याला मध्यमेश्वर म्हटले गेले असावे कदाचित.

बाबांचे वडील, आबा आम्हाला त्यांच्या जन्मगावाच्या गोष्टी सांगायचे. मुंबईत बसून गाव ही एक दुर्बोध संकल्पना भासायची. नाशिकहून निफाडजवळ कोठूर नावाचं खेडेवजा गाव जेव्हा आबांसोबत पाहिलं ते म्हणजे गाव असं कोण जाणे, आजतागायत मनात ठसलंय. कोठूरच्या जवळून गंगा (गोदावरीला दक्षिण गंगा म्हणतात) वाहते हे त्याचं परमभाग्य. या तीराजवळ एक बनेश्वराचं पेशवेकालीन मंदिर आहे. हे आबांच्या बोलण्यात हमखास संदर्भ म्हणून यायचं. हे या भागातलं पाहिलेलं पहिलं शिवमंदिर. एकावर एक अशा दोन शिवपिंडी इथे पाहिल्याचं आठवतं. कोठूरहून नांदूर गाठायचं म्हणजे कारंजगाव-मांजरगाव-खानगाव थडी असं करावं लागे नाहीतर निफाडमार्गे शिवरे-दिंडोरी असा वळसा घालावा लागायचा. निफाड म्हणजे कादवासोबत वैनथा या नाजूक नदीचा संगम. तिथलं संगमेश्वराचं दर्शन घेऊन म्हसोबाच्या देवळाच्या बाजूने दिंडोरीकडे वळायचं. नांदूरच्या परिसराला महानुभाव पंथ आणि चक्रधर स्वामींचे पवित्र सान्निध्य लाभलेला आहे, त्याचा एक अजून मानाचा तुरा.

या परिसरात अश्मयुगीन अवशेष मिळाले असल्याने या भागाचे प्राचीनत्व सिद्ध होते.

नांदूर गावात आलं की, एका बाजूस गोदावरी-कादवा नद्यांच्या संगमाचे काथरगावचे संगमेश्वर पाहायचे आणि मग मध्यमेश्वराचे मंदिर पाहायचे. संगमेश्वराचे मंदिर धरणाच्या खाली गोदावरी नदीच्या तीरावर असून त्याची अजस्र पुरातन पिंड लक्ष वेधून घेते.

नांदूरमध्यमेश्वर गावाच्या नावाची उत्पत्ती तिथल्या गंगा मध्यमेश्वराच्या मंदिरावरून झाली असावी. गावाचे नाव मूळ नांदूर असावे असे सांगणारा एक मराठी शिलालेख या देवळाच्या दीपमाळेवर आहे.

आत प्रवेश केल्यावर जी साधारण वीसएक फुटी दीपमाळ उभी दिसते, त्या दीपमाळेवरच तो मराठी शिलालेख आहे. या शिलालेखात मौजे नांदूर असा उल्लेख आहे. म्हणजेच गावाचे नाव पूर्वी फक्त नांदूर असणार. मध्यमेश्वर मंदिरामुळे आता नांदूरमध्यमेश्वर म्हटले जाऊ लागले असावे असा कयास आहे.
मंदिराच्या तटबंदीवरून चौफेर नजर फिरवता नांदूरमध्यमेश्वर गाव गोदावरीचा काठ पकडून वसलेले दिसते. इथून अजून एक गुलदस्त्यातले सुंदर मंदिर दिसते. हे मृगव्याध्येश्वराचे मंदिर. मात्र या देवळाला जायचा रस्ता कच्चा आहे. खानगाव थडीला जाऊन रूढ रस्त्याने गेलं की, महानुभाव पंथाचा मठ लागतो. या मठाजवळून असलेल्या गणपतीच्या मंदिराजवळ हे मंदिर आहे. गोदावरीला पाणी नसल्याने या रस्त्याने जाता येते. हा रत्ता आपल्याला थेट मृगव्याध्येश्वर मंदिराकडे घेऊन जातो. हे मंदिर स्थापत्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं असं उत्कृष्ट मंदिर आहे. तिथल्या प्रमुख तसेच आजूबाजूच्या लहान मंदिरांवरील दगडातील कोरीव कामही अधोरेखित करण्यासारखे आहे. मुख्य मंदिराची द्वारशाखा सुस्थितीत आणि संपन्न आहे. यावरील अनेक शिल्पे चांगल्या स्थितीत आहेत. मृगव्याध्येश्वर मंदिरावर हरिणाचे शिल्प आहे, ज्याचा संदर्भ रामायणाशी जोडला जातो. मंदिराबाहेरील एका घुमटावरून आपल्याला प्राचीन स्थापत्यशैलीचे प्रत्यंतर होते.

लहानसे नांदूरमध्यमेश्वर म्हणजे मंदिरांची पंढरीच आहे जणू. मृगव्याध्येश्वरापासून थोडय़ाच अंतरावर धरणगाव रस्त्याने गावात गेल्यावर एका उंच टेकडावर पेशवेकालीन महादेव मंदिर सिद्धेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे. मंदिरामागील बाजूला हनुमानाची मूर्ती आहे. गावात अनेक जुने वाडे अवशेष म्हणून उरलेले आहेत. असे अनेक वाडे पूर्वी गावात होते असे सांगितले जाते. मात्र ब्राह्मणवाडा गतवैभवाची खुणा जपत आजही शाबूत आहे.

नांदूरमध्यमेश्वर बंधारा झाल्यानंतर गोदावरी-कादवा नद्यांच्या प्रवाहातील गाळ साचल्यामुळे हा परिसर पक्ष्यांच्या निवासासाठी अनुकूल ठरला. आता दरवर्षी फ्लेमिंगो, डक, स्पूनबिल, कॉमन क्रेन यांसारख्या विविध देशी-विदेशी दोनेकशे प्रकारचे पक्षी या अभयारण्यात येतात. अनेकविध माशांच्या जातीही येथे पाहायला मिळतात. या धरणाच्या बॅकवॉटर परिसरात सतत अनेक पक्ष्यांची रेलचेल असते. या परिसरात व बंधाऱयाच्या पात्रात अनेक दुर्मिळ मूर्ती सापडत आहेत. नांदूरचं हे मध्यमेश्वर आणि त्याच्या सभोवतीच्या सर्व दिशा सांभाळणारी प्राचीन शिवमंदिरं पाहताना 'शिव' या शब्दातली शक्ती जाणवल्याशिवाय राहत नाही.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top