Sunday, 30 Jun, 7.50 am सामना

मुख्य पान
शिवसेना मराठा समाजासोबत ठाम !- उद्धव ठाकरे

सामना प्रतिनिधी। मुंबई

मराठा समाजाच्या आरक्षणाला हायकोर्टाने वैध ठरवले आहे, पण दुर्दैवाने आता ही लढाई सर्वोच्च न्यायालयात गेली तर शिवसेना पूर्ण ताकदीनिशी मराठा समाजासोबत ठामपणे उभी राहील आणि ती लढाईसुद्धा जिंकून दाखवू, अशी ग्वाही शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.

सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी शिवसेना भवनात भेट घेतली त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. आरक्षणाची लढाई लढणाऱया वीरांचे अभिनंदन करतो असे सांगून ते म्हणाले, तुम्ही आभार मानायला आलात, पण श्रेयासाठी आम्ही हे केलेले नाही. तुमच्या हातात भगवा, आमच्याही हातात भगवा असा उल्लेख मराठा समाजाचे विनोद पाटील यांनी केला होता. तोच धागा पकडून उद्धव ठाकरे म्हणाले, हा भगवा आपल्या हृदयात आहे. महाराष्ट्र भूमीत जन्माला येतानाच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलचा आदर, प्रेम, श्रद्धा घेऊनच आपण सर्व जन्माला आलो आहोत.

एकजूट कायम ठेवा
मराठा-मराठेतर असा वाद न करता शिवरायांचे मावळे म्हणून महाराष्ट्रातील सगळेच एकत्र आलो तर ही ताकद केवळ राज्य वा देशापुरती मर्यादित राहणार नाही, तर अवघ्या जगात अद्वितीय ताकद निर्माण होईल, असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, मराठा आंदोलनाच्या निमित्ताने तुम्ही महाराष्ट्रात भगवा सागर उभा केलात. भगव्याची ताकद, एकजूट संपूर्ण जगाला दाखवली. त्या एकजुटीला मानाचा मुजरा करतो आणि ही ताकद, ही एकजूट कायम अशीच ठेवा.

आरक्षणाआड कुणी येऊ नये

कोणाचाही हक्क न डावलता मराठा समाजाला आरक्षण मिळाले असेल तर त्याच्या आड कोणी येऊ नये, असे उद्धव ठाकरे म्हणाले. उगाच लढण्यासाठी म्हणून कोणी लढाई लढू नये. त्यांच्याही काही मागण्या असतील, म्हणणे असेल तर त्यांनी यावे. त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू, असे आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.

यावेळी विनोद पाटील यांनी मराठा समाजाच्या वतीने उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. शिवसेनेने जी मदत केली ती कधीच विसरता येणार नाही. हा इतिहास सुवर्णाक्षरात लिहिला जाईल आणि त्यात शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव निश्चितच असेल, असे पाटील म्हणाले. विधिमंडळात शिवसेनेच्या सर्व आमदारांनी सभागृहात मराठा समाजाच्या बाजूने मतदान केले त्याबद्दल आभार व्यक्त करून दिल्ली दरबारीही शिवसेना खासदारांनी आम्हाला मदत करावी अशी मागणीही पाटील यांनी केली. तर मराठा क्रांती मोर्चाच्या तीन वर्षांच्या लढाईला शिवसेना नेते- युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांचीही बहुमूल्य मदत झाल्याचा उल्लेख वीरेंद्र पवार यांनी केला.

यावेळी शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, आमदार अनिल परब, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते.

कोणाच्याही ताटातील एक कणही कमी न करता मराठा समाजाला जर त्यांचा हक्क मिळत असेल तर उगाच लढण्यासाठी कोणी विरोधाची लढाई लढू नये. त्यांच्या काही व्यथा, मागण्या असतील तर त्यांनीही यावे. त्यांच्या मागण्यांसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू.

.उरलेल्या तीन टक्क्यांसाठीही मार्ग काढू!
मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण मिळावे ही आमची इच्छा होती, आजही आहे. त्या इच्छेमुळेच सरकार म्हणून आम्ही सोळा टक्के आरक्षण दिले होते. न्यायालयाने जरी ते बारा-तेरा टक्क्यांवर आणले असले तरी उरलेल्या तीन टक्क्यांसाठी काही मार्ग निघत असेल तर तोही काढू, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आंदोलन काळात मराठा तरुणांवर दाखल झालेले गुन्हे टप्प्याटप्प्याने मागे घेण्यास सुरुवात झाली आहे. त्यात कुणावरही अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी दिले.Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top