हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून लोकमान्यनगर पाडा नंबर १ येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने अनोखा देखावा तयार केला आहे. या देखाव्याच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुखांचा झंझावाती जीवनपट उलगडला असून तो पाहण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी होत आहे.
शिवसेनाप्रमुखांच्या जीवनातील अनेक वादळी प्रसंग यानिमित्ताने देखाव्याच्या माध्यमातून समोर आले आहेत.
झकास सोशल फाऊंडेशनच्या वतीने शिवसेनाप्रमुखांच्या जीवन प्रवासावर आधारित ‘बाळासाहेब-एक वादळ’ हा भव्य दृकश्राव्य देखावा सादर केला आहे. त्यात बाळासाहेबांचे जाज्वल्य विचार, त्यांचा कुंचला, लेखणी, संघर्ष, कर्तृत्व, स्पष्टवक्तेपणा अशा अनेक पैलूंवर प्रकाशझोत टाकला आहे. शिवसेनाप्रमुखांचे संगीत व कलाक्षेत्राशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध, संघटन कौशल्य, राजकीय प्रवास दर्शवणारी अनेक छायाचित्रे तसेच ध्वनी व प्रभावी दृश्यांच्या माध्यमातून अनुभवण्यात येत आहेत.
सध्याच्या तरुण पिढीला शिवसेनाप्रमुखांचे विचार आणि त्यांचा जीवनप्रवास सहजपणे समजावा यासाठी हा उपक्रम करण्यात आला असल्याचे गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सांगण्यात आले. मंडळातील ज्येष्ठ व तरुण कार्यकर्त्यांनी स्वतः मेहनत घेऊन देखावा बनवला आहे.
फक्त चार दिवसांत उभारणी
अवघ्या चार दिवसांत स्थानिक कलाकारांनी या देखाव्यास मूर्त रूप दिले. ‘बाळासाहेब एक वादळ’ हा देखावा पाहण्यासाठी ठाणे शहराच्या विविध भागांतून गणेशभक्त येत आहेत. ठाणेकरांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन झकास सोशल फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

