Saturday, 28 Sep, 12.40 pm सामना

मुंबई
शिवसेनाप्रमुखांना दिलेले वचन एक ना एक दिवस पूर्ण करणारच! उद्धव ठाकरे

मी शिवसेनाप्रमुखांना हातात हात घेऊन वचन दिलेलं आहे की एक ना एक दिवस मी शिवसैनिक मुख्यमंत्रीपदाच्या पदावर बसवून दाखवेन. वाट्टेल त्या टोकाला जाऊन ते वचन पूर्ण करेन' असे उद्गार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले. मुंबईतील रंगशारदा येथे शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि इच्छुकांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी युती होणारच असे ठामपणे सांगितले. आपल्या भाषणामध्ये त्यांनी सध्या राज्यात सुरू असलेल्या घडामोडींबाबतची रोखठोक मते मांडली.

'मला कोणाचं वाईट होताना अजिबात आनंद होत नाही. शुक्रवारी दिवसभर ज्या बातम्या चालत होत्या की पवारसाहेबांना ईडीची नोटीस आली म्हणतात, नाही आली असं म्हणतात मग अजित पवारांनी राजीनामा दिला. मला नाही त्यांच्या कौंटुबिक भांडणात रस. मला नाही त्यात आनंद व्यक्त करायचा' असं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेनेने जे कमावलं आहे ते संघर्षातून कमावले असून ते कोणाच्या आशीर्वादाने,मेहनतीने कमावलेलं नाही असे ते म्हणाले जो कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका असं शिवसेनाप्रमुख नेहेमी म्हणायचे याची आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईडी कार्यालयात जाण्याचा घेतलेला निर्णय बदलणे आणि त्यानंतर अजित पवार यांनी राजीनामा देणे या घटनांवर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या खास शैलीत भाष्य केलं. ते म्हणाले की 'असाच एक क्षण शिवसेनेच्या आय़ुष्यात आला होता, 2000 साली काही लोकांनी शिवसेनाप्रमुखांना अटक करण्यासाठी दंड थोपटले होते. मुंबई-महाराष्ट्र उत्स्फुर्तपणे तेव्हा रस्त्यावर उतरत होता. एक दिवस शिवसेनाप्रमुखांनी स्वत:च न्यायालयात जाण्याचं ठरवलं, तेव्हा त्यांना असे कोणी निरोप दिले नव्हते की जाऊ नका हं! कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. ते न्यायमूर्तींसमोर जाऊन उभे राहिले आणि विचारले की सांगा माझा गुन्हा काय आहे? तेव्हा सरकार कोणाचं होतं हे स्पष्ट आहे. तेव्हा कोणीही मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला नव्हता, आणि आम्हाला मध्यस्तीची गरजही नव्हती.' उद्धव ठाकरे म्हणाले की 'सध्याचं सरकार हे तुमच्याशी सूडाने वागताय असं वाटतंय मात्र तेव्हा तेव्हा तुमच्या बुडाला सत्तेची खुर्ची चिकटलेली होती.' महाराष्ट्राला कधीही कोणाशी सूडाने वागलेलं आवडत नाही. कोणावर जर सूड उगवायाचा प्रयत्न केला तर मग महाराष्ट्राचा आसूड त्याच्यावर ओढला जातो असंही उद्धव ठाकरे म्हणाले

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की मी अखेरच्या काळामध्ये शिवसेनाप्रमुखांना एक ना एक दिवस मी शिवसैनिक मुख्यमंत्रीपदाच्या पदावर बसवून दाखवेन असे वचन दिले होते. 'मी राजकारण सोडणार नाही, मी शेती करणार नाही मी शिवसैनिक मुख्यमंत्री करून दाखवेन' असे म्हणत त्यांनी अजित पवार यांना चिमटा काढला.

युतीची एकदोन दिवसांत घोषणा होईल. माझं आणि अमित शहा तसेच मुख्यमंत्र्यांशी व्यवस्थित बोलणं सुरू आहे असे उद्धव ठाकरे यांनी भाषणात सांगितले. जे राजकारण घडतंय-बिघडतंय ते बघून मी,अमित शहा आणि मुख्यमंत्री कुठे जिंकण्याची शक्यता कोणाला कुठे जास्त आहे हे तपासत असल्याचेही ते म्हणाले. प्रत्येक मतदारसंघात शिवसेनेची ताकद पाहिजे. गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसेना ही हवीच असे उद्धव ठाकरे म्हणाले. आपली जागा आहे तिथे भाजपची ताकद मिळाली पाहिजे आणि जिथे भाजपची जागा आहे तिथे माझ्या शिवसेनेची ताकद त्यांच्यामागे उभी करावी लागेल असे उद्धव ठाकरेंनी पुढे बोलताना सांगितले.

जागावाटप झाल्यानंतर मला बंडखोरी चालणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. तसेच युती झाली आता समोर कोणीच नाही असं समजून गाफील राहू नका असेही ते म्हणाले. 'जेव्हा समोर कोणीच नसतो तेव्हा धोका अधिक असतो. समोरचा कुठून येईल हे सांगता येत नाही यामुळे तुम्ही गाफील राहू नका' असे उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना आणि इच्छुकांना सांगितले.

उमेदवारी निश्चित करण्याचा काळ हा माझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक असतो. जीवाला जीव देणारी माणसं उमेदवारी न मिळाल्याने तुटतात, त्यावेळी माणसं नाही तर अंत:करण तुटत असतं. मग ती जातात आणि स्वत:चा, पक्षाचा, कार्याचा घात करतात आणि मग फिरून परत येतात आणि सांगतात की आमचं चुकलं. आता अशा चुका करू नका असे आवाहनही उद्धव ठाकरेंनी तमाम शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना केले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>