Dailyhunt
सिंधुदुर्ग एलसीबीची धडाकेबाज कारवाई: कणकवली आणि सावंतवाडीत धुमाकूळ घालणारी आंतरराज्य टोळी 30 तासांत जेरबंद

सिंधुदुर्ग एलसीबीची धडाकेबाज कारवाई: कणकवली आणि सावंतवाडीत धुमाकूळ घालणारी आंतरराज्य टोळी 30 तासांत जेरबंद

सामना 1 week ago

णकवली आणि सावंतवाडी शहरात लागोपाठ दोन रात्री दुकाने फोडून धुमाकूळ घालणाऱ्या चोरांच्या टोळीला जेरबंद करण्यात सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (एलसीबी) अवघ्या 30 तासांत यश आले आहे.

या कारवाईत पोलिसांनी दोघांना रायगड जिल्ह्यातील रोहा येथून ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कणकवली शहरात 4 एप्रिल रोजी एकाच रात्री सहा दुकाने फोडण्याची धाडसी चोरी झाली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 5 एप्रिल रोजी चोरट्यांनी आपला मोर्चा सावंतवाडीकडे वळवत तिथेही सहा दुकाने फोडली. लागोपाठ झालेल्या या चोरीच्या सत्रामुळे व्यापाऱ्यांमध्ये घबराट पसरली होती. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले होते.

एलसीबीचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अनिल हाडळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान संशयित आरोपी रायगडच्या दिशेने पळाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून 5 एप्रिल रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास रोहा येथून राहुल उर्फ दिवाण ओमप्रकाश तोमर (36) आणि राजपथ संतराम पाल (52) या दोघांना अटक करण्यात आली. हे दोन्ही आरोपी सध्या भाईंदर पूर्व येथील फुटपाथवर वास्तव्यास असून ते मूळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत.

या मोहिमेत हवालदार प्रकाश कदम, राजेंद्र गोसावी, किरण देसाई, आशिष गंगावणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू जामसंडेकर, ज्ञानेश्वर तवटे आणि जॅक्सन घोंसालवीस यांनी मदत केली. तसेच या कारवाईत कणकवली रेल्वे पोलीस, रोहा पोलीस आणि रोहा रेल्वे पोलीस यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. अवघ्या 30 तासांत गुन्ह्याचा छडा लावल्याबद्दल सिंधुदुर्ग पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana