ठळक
'सिरम'ची कोव्हिशिल्ड लस पश्चिम महाराष्ट्रात दाखल

कोरोना लसीकरणाच्या वितरणाला सुरुवात झाली असून, शनिवारपासून लसीकरणाला सुरुवात करणार आहे. यासाठी सीरम इन्स्टिटय़ूटची कोविशिल्ड लस पश्चिम महाराष्ट्रात दाखल झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱयांना लसीकरण केले जाणार असून, त्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. लसीचे डोस 2 ते 8 डिग्री तापमानातील शीतसाखळी उपकरणात ठेवण्यात आले आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
नगर जिह्यात शनिवारी 21 केंद्रांवर कोरोना लसीकरण करण्यात येणार असून, कोरोना लस घेऊन येणारे वाहन आज भल्या पहाटे तीन वाजता नगरमध्ये दाखल झाले. जिह्यासाठी 39 हजार 290 डोस प्राप्त झाले आहेत. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या शीतसाखळी उपकरणामध्ये लस ठेवण्यात आली असून, येथूनच जिल्हा व मनपाच्या आरोग्य विभागाकडे लसीचे वितरण केले जाणार आहे. जिल्हा परिषदेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, डॉ. दादासाहेब साळुंके यांच्या निगराणीखाली लसीचा पहिला साठा उतरवून घेण्यात आला आहे.
सांगली जिह्यात कोविशिल्ड लसीचे 32 हजार डोस बुधवारी सायंकाळी दाखल झाले. जिल्हा परिषदेच्या शीतगृहात लस ठेवण्यात आली. पहिल्या टप्प्यात 26 हजार 554 हेल्थ केअर वर्कर्संना लसीकरण केले जाईल. दरम्यान, लसीकरण केंद्रांपैकी पाच केंद्र रद्द करण्यात आले, त्यामुळे जिह्यात 12 ठिकाणीच लसीकरण होणार असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. महानगरपालिका क्षेत्रातील आठ ठिकाणांऐवजी सहा ठिकाणी लसीकरण होईल. ग्रामीण भागातील नऊ केंद्रांऐवजी सहा केंद्रांवर लसीकरण होणार आहे. तासगाव ग्रामीण रुग्णालय, चिंचणी व कुरळप प्राथमिक आरोग्य केंद्र लसीकरणासाठी रद्द करण्यात आले आहे.
सोलापूर जिह्यात कोरोनाचे 34 हजार डोस उपलब्ध झाले असून, जिल्हा लस भांडारमध्ये त्यांना ठेवण्यात आले आहे. जिह्यातील 16 केंद्रांवर लसीकरण होणार आहे. पहिल्या टप्प्यात 30 हजार 184 आरोग्य कर्मचाऱयांना लस दिली जाणार आहे.
सातारा जिह्यात 30 हजार कोरोना लसी आल्या आहेत. सातारा जिल्हा रुग्णालय, नागठाणे आरोग्य केंद्र, कराड उपजिल्हा रुग्णालय, कृष्णा रुग्णालय (कराड), पाटण ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव ग्रामीण रुग्णालय, मायणी मेडिकल कॉलेज, दहिवडी ग्रामीण रुग्णालय, फलटण उपजिल्हा रुग्णालय, खंडाळा ग्रामीण रुग्णालय, मिशन हॉस्पिटल (वाई) ही 11 ठिकाणे निश्चित केल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी दिली.