Friday, 06 Aug, 4.30 am सामना

ठळक
ठसा - शिवशंकरभाऊ पाटील

>> प्रशांत गौतम

ज्ञान, भक्ती आणि कर्माचा त्रिवेणी संगम ज्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता, कर्मयोग ज्यांनी आयुष्यात जगला आणि निःस्थार्थी सेवेचा आदर्श अवघ्या जगासमोर दाखवून दिला ते शिवशंकरभाऊ वैकुंठवासी झाले. शेगावनगरी ओळखली जाते ती श्री गजानन महाराजांच्या ख्यातीमुळे. शेगावचा लौकिक जगभरात पोहोचला तो शिवशंकरभाऊंच्या लक्षणीय कार्यकर्तृत्वातून. संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त म्हणून भाऊंनी प्रदीर्घ काळ कार्य केले. त्यांच्या निधनाने कर्मयोगाचा दीपस्तंभ मावळला आणि विदर्भपंढरी पोरकी झाली. 'सर्व भवन्तु सुखिनः शिव भावे जीव' हे संस्थानचे ब्रीदवाक्य आहे. भाऊंनी आपल्या वैविध्यपूर्ण कार्यातून ते प्रत्यक्षात आणले. भाऊ हे तपस्वी होते, श्री गजानन महाराजांचे निःसीम भक्त होते. सेवाभाव काय असतो, याचे उत्तर आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्त्वातच दिसून येते. हेच सात्विक संस्कार भाऊंवर झाले. वयाच्या नवव्या वर्षी ते संस्थानच्या सेवेत रुजू झाले. तब्बल आठ दशकापासून हा सेवायज्ञ अविरत अखंड सुरू होता. म्हणूनच 'सेवा हीच साधना' या संस्थानाच्या ब्रीदवाक्यास भाऊंनी प्रत्यक्ष आचरणात आणले. विविध सेवाकार्य करीत असताना श्रद्धा, भक्ती आणि विश्वास ही त्रिसूत्री समाजमान्य केली. म्हणूनच भाऊंचे संपूर्ण आयुष्य इतरांसाठी प्रेरणादायी ठरले. 'जगाच्या कल्याणा संताच्या विभूती! देह कष्टविती परोपकारे!!' या प्रसिद्ध असलेल्या संतवचनाला भाऊंनी परमार्थाची जोड दिली आणि श्री गजाननाची सात्विक वृत्तीतून सेवा केली. भाऊंचे प्रदीर्घ आजारामुळे 4 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी सहा वाजता निधन झाले, तो दिवस एकादशीचा! संतनगरीच्या आधुनिक कर्मयोग्याने वैकुंठागमन केले. शिवशंकर सुखदेवराव पाटील यांचा जन्म 12 जानेवारी 1940चा. वडील गणेश पाटील यांच्या आज्ञेवरून संस्थानात सेवेकरी म्हणून दाखल झाले. 31 ऑगस्ट 1962पासून ते संस्थानचे विश्वस्त झाले. 1969 ते 1990 अशी तब्बल दोन दशके संस्थानचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. एवढेच नाही तर 1974 ते 1979 या काळात भाऊ शेगावचे नगराध्यक्ष म्हणून कार्यरत होते. आध्यात्मिक कार्याला राजकीय अधिष्ठान लाभले, त्याचे फळही उत्तमच मिळते. भाऊंच्या नगराध्यक्ष असल्यामुळे संतनगरीचा विकास होण्यास हातभारतच लागला. संस्थानचे कार्य दाहीदिशांना वाढत असताना, परवानग्या मिळवताना त्यांनी कोणत्या पुढाऱयाकडे शब्द टाकला नाही. एवढेच नाही तर मंदिरात श्रीच्या दर्शनासाठी अनेक पुढारी येत असले तरी ते कुठल्या पक्षाच्या व्यासपीठावर दिसले नाहीत. 'महाराजांची इच्छा असेल तर संस्थानचे काम होईल, नाही तर नाही, मात्र कष्टात आणि प्रयत्नात थोडीही कसर ठेवायची नाही, ही भाऊंची कायम भूमिका राहिली. स्वतः दहावी पास असलेल्या भाऊंनी श्री गजानन महाराज शिक्षण संस्था स्थापन केली, त्या माध्यमातून गाव आणि परिसरातील हजारो विद्यार्थ्यांना इंजिनीअर बनवले. संतनगरीत असलेले श्री संत गजानन महाराज मंदिर लौकिकप्राप्त समजले जाते. आज मंदिरात वीस हजार सेवेकरी सेवा देत असतात, निःस्वार्थी वृत्तीने ते भाविकांना सेवा देतात. भाऊंचे या मागचे नियोजन दूरदृष्टीचे असते. भाऊंची ओळख ही व्यवस्थापनगुरू म्हणून जगभरात आहे, ज्याची दखल अमेरिकेतल्या हॉवर्ड विद्यापीठास घ्यावी लागली. श्रद्धा आणि सेवाभाव एकत्र आला की काय होते ते भाऊंच्या कार्याकडे बघितल्यावर आपल्या लक्षात येते. श्री गजानन महाराज मंदिर असो, भक्तनिवास किंवा आनंदसागरसारखा 650 एकर जागेत असलेला प्रकल्प असो किंवा महाराष्ट्रातील सर्वोत्तम सेवा देणारे तेथील इंजिनीअरिंग कॉलेज असो. त्याचा नावलौकिक चंदनाच्या सुगंधाप्रमाणे सर्वदूर पसरत गेला. भाऊंनी आपल्या कार्यास केवळ मंदिरापुरतेच मर्यादित न ठेवता ते विविध उपक्रम राबवण्यातून विविधांगी केले. आसपासच्या गावांत वैद्यकीय सुविधाही पुरवली.

सदगुरू श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येणारा भाविक मंदिरातील सेवेकऱयांची तत्परता, जागरूकता, कर्तव्यपरायणता पाहून धन्य होतो. संस्थानाकडून मिळणाऱया सुविधांबाबत समाधान पावतो. संस्थानात सुरू असलेले नियोजनबद्ध काम आणि सेवेकऱयांच्या पाठीमागे असलेली भाऊंची कल्पकदृष्टी याचा पावलोपावली प्रत्यय देत असते. संस्थानात दर शुक्रवारी दानपेटय़ा उघडल्या जातात. विश्वस्तांच्या साक्षीने भाविकांनी दिलेले दान मोजले जाते. सोने, चांदीचे दागिने, नोटा याप्रमाणे चिल्लर नाणीसुद्धा असतात. दानपेटीत आलेली नाणी पाहून भाऊंच्या चेहऱयावर समाधान पसरत असे. भाऊ म्हणत, जोपर्यंत संस्थानच्या दानपेटीत ही गरीबांच्या श्रमाची नाणी येतील तोपर्यंत संस्थानच्या सेवेकऱयांवर गरीबांचा विश्वास कायम राहील. खरे आहे ते. भाउंैनी श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱया भक्तालाच देव मानले होते. संस्थानच्या माध्यमातून जोपर्यंत शरीर साथ देईल तोपर्यंत भक्तांना मनोभावे ते सेवा पुरवत होते. खरे तर संतविचार हे त्यांच्यासाठी वैभव होते तर सेवाभाव हा धर्म होता. मंदिरात येणारा कुणीही उपाशी जाऊ नये याकडे त्यांचा कटाक्ष राहिला.
'सेवा परमो धर्म' हे तत्त्व भाऊंनी अखेरपर्यंत जपले आणि ज्ञानदेवांचा कर्मयोग प्रत्यक्ष आचरणात आणला.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top