महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचे (टीईटी) पेपर फोडल्यानंतर राज्य पात्रता परीक्षेचाही (सेट) पेपर फोडण्याचा डाव होता. टीईटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार बिजेंद्रकुमार गुप्ता याच्या चौकशीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मात्र टीईटी परीक्षेतील भ्रष्टाचाराचे बिंग फुटल्याने आरोपींचा हा डाव ठरला. इतकेच नव्हे तर परीक्षाकेंद्र मॅनेज करून टीईटी पेपरची उत्तरेही पुरवण्याची या टोळीने पुरेपूर तयारी केली याचीही कबुली आरोपींनी दिल्याने दलालांनी शिक्षण व्यवस्था पुरती पोखरून काढल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.
टीईटी प्रकरणाबाबत आता नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. मुख्य सूत्रधार बिजेंद्रकुमार गुप्ता याच्या केलेल्या चौकशीतून टीईटी पेपर कसा फुटला याचा घटनाक्रमच उजेडात आला असून त्याने 'नीट' नंतर 'सेट' परीक्षा आमचे टार्गेट होते अशी कबुली दिली आहे. पेपर फोडाफोडीच्या रॅकेटमध्ये पुण्यातील एका चतुर्थ श्रेणी सरकारी कर्मचाऱ्याचा हात होता. हाच कर्मचारी पन्नासहून अधिक उमेदवारांच्या संपर्कात होता. छपाई कारखान्यातील ज्युनिअर कर्मचाऱ्यांना पैशांचे आमिष दाखवून आरोपींनी ऑफलाईन पेपरच फोडला नाही तर ऑनलाईन परीक्षा केंद्र मॅनेज करून उमेदवारांना उत्तरे पुरवण्याची तयारीही त्यांची होती असे तपासात समोर आले आहे.
पथकाची बिहारमध्ये धडक
रॅकेटचे आर्थिक व्यवहार आणि त्याची पाळेमुळे शोधण्यासाठी विशेष तपास पथकाने बिजेंद्र गुप्ता याच्यासह बिहारमधील समस्तीपूर येथे धडक दिली. पेपर नेमका किती उमेदवारांपर्यंत पोहोचला आणि या रॅकेटमागे आणखी कोणते चेहरे आहेत, याचा शोध सुरू आहे.
बड्या धेंड्यांचा हात असण्याची शक्यता
टीईटी प्रकरणातील आरोपी पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवताच आता पोपटासारखे बोलू लागले आहेत. टीईटी पेपर छापखान्यातून कसा बाहेर आला, किती उमेदवारांच्या संपर्कात आमची लोकं होती.. सरकारी कर्मचाऱ्यांनी कशी मदत केली याची जंत्रीच त्यांनी मांडली आहे. मात्र हे प्रकरण वरवर दिसत आहे तितके साधेसुधे नसून विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे आहे. त्यामुळे या प्रकरणात बड्या धेंड्यांचा हात असण्याची शक्यता असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

