Monday, 26 Oct, 6.00 am सामना

ठळक बातम्या
तीळाएवढय़ा मदतीचे मोल

>> रोहिणी हट्टंगडी (ज्येष्ठ अभिनेत्री)

छोटय़ा छोटय़ा गोष्टींतून एकमेकांना सांभाळणे हे कोणीही करू शकते. यालाच मदत म्हणतात.

कोरोनाच्या महामारीत अनेकांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागले. लॉकडाऊनमध्ये जे सर्वसामान्यांनी करायला हवे ते मी केलेलेच आहे. माझ्या घरी स्वयंपाक आणि लादी-कचरा करण्यासाठी दोघीजणी येतात. त्या दोघींनाही या काळात त्यांचा पूर्ण पगार दिला, त्यांना दोन महिन्याचे रेशन दिले तसेच माझ्या ड्रायव्हरला पूर्ण पगार दिलेला आहे. तो गावी गेला होता तरी मी पगार इथून पाठवत होते.

बऱयाच जणांनी ही अशी मदत केलेली आहे. माझ्या वयामुळे मला प्रत्यक्षात जाऊन कोणाला मदत करता येत नव्हती पण जेवढी शक्य आहे तशी मी मदत करत होते. मला बाहेरच पडता येत नव्हतं. पण माझ्या परीने मी मदत करत होते. कोकणात वादळ आलेले त्या पार्श्वभूमीवर एका व्यंगचित्रकारांनी आवाहन केले होते. आपले व्यंगचित्र काढून त्यातून मिळालेले पैसे त्या भागात देणार होते. तेव्हा मीही माझे व्यंगचित्र काढून घेतले होते. तशा प्रकारे त्यांना मदत केली. त्यामुळे शारीरिकदृष्टय़ा मी जात नसले तरी घरात बसून वेगवेगळ्या प्रकारची मदत करत होते, मुळात मी आधीपासून मला शक्य तेवढी लोकांना मदत करत असते.

खरंतर एका गोष्टीची या काळात प्रकर्षाने जाणीव झाली ती म्हणजे माणुसकी. आपण पैशांची मदत करत असतो पण काही वेळेला आपण काही माणसं आपली कोणीच नसताना कसलीच अपेक्षा न ठेवता निःस्वार्थपणे आपल्याला मदत करत असतात. याचं उदाहरण म्हणजे आमच्या बिल्डिंगचा वॉचमन. त्याचा एक प्रसंग सांगावासा वाटतो. मी सातव्या मजल्यावर राहते. लॉकडाऊनमध्ये जेव्हा केव्हा एकटी असेन त्यावेळी तो येऊन सतत चौकशी करून जात असे. तो मांस-मच्छी अजिबात खात नाही, किंबहुना त्याला हातही लावत नाही. बाकीच्या काही गोष्टी असतील तर तो आम्हाला वरती आणून देतो पण मांस-मच्छी असतील तर ते घेण्यासाठी आम्हाला बिल्डिंगच्या खाली जावे लागते.

एकदा लॉकडाऊनमध्ये माझी मासेवाली माझ्यासाठी मासे घेऊन आली होती. त्यावेळी घरी मी एकटीच होते, त्याने माँजी अकेली उपर है, मैं उपर लेके जाता हू. त्याने फोन केला, त्याला मी बोलले खाली येते. पण त्याने तुम्ही खाली येऊ नका, मी वर घेऊन येतो आणि तो कधीही मांस-मच्छीला हात न लावणारा मनुष्य, त्या दिवशी मात्र त्याने त्याला हात लावला आणि वर घेऊन आला. म्हणजे त्याच्या कृतीतून कळले की, आपल्या वॉचमनलाही प्रत्येकाची किती काळजी असते. त्याची ती मदत माझ्या चांगलीच लक्षात राहिली.

त्याने केलेली मदत ही माणुसकी जपणारी मदत होती. दरवेळी आपण केलेली मदत लक्षात ठेवण्यापेक्षा समोरच्याने केलेली मदतही तेवढीच महत्त्वाची आणि समाधान देणारी असते. याची मला या काळात जाणीव झाली. त्यांनाही मी नंतर काहीना काही मदत करत होते. बऱयाचदा सगळ्यांना मदत करण्याची इच्छा असते पण आपले हात तोकडे पडत असतात. पण मुळात ही मदत असते ती स्वतःला बरं वाटण्यासाठी आपण करत असतो. आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या चेहऱयावरचा आनंद पाहून समाधान मिळत असतं. मदत करून आपण काही ग्रेट करतो असे काही नाही. ती माझी जबाबदारी आहे. ते सगळं करून मला स्वतःलाच बरे वाटते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top