Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
टीम इंडियामध्ये गुजरात पॅटर्न; अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी आणि वन डे संघ जाहीर, गिलच्या आयपीएल संघातील 6 खेळाडूंचा समावेश

टीम इंडियामध्ये गुजरात पॅटर्न; अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी आणि वन डे संघ जाहीर, गिलच्या आयपीएल संघातील 6 खेळाडूंचा समावेश

सामना 5 months ago

अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी हिंदुस्थानच्या संघाची घोषणा करण्यात आली असून यामध्ये गुजरात टायटन्सच्या खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळाले. आयपीएल संपल्यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध हिंदुस्थानचा संघ एक कसोटी सामना खेळेल आणि त्यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आयोजित करण्यात आली आहे.

हिंदुस्थानचे सामने कधी व कुठे होतील…

हिंदुस्थानी संघ अफगाणिस्तानविरुद्ध 6 जूनपासून कसोटी सामना खेळेल. हा सामना मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. त्यानंतर 14, 17 आणि 20 जून रोजी तीन एकदिवसीय सामने खेळले जातील. हे सामने धर्मशाला, लखनौ आणि चेन्नई येथे आयोजित केले जातील.

गुजरात टायटन्समधील किती खेळाडू संघात…

शुभमन हा गुजरात टायन्सचा कर्णधार आहे. त्यामुळे यावेळी हिंदुस्थानच्या संघात गिलसह गुजरात टायटन्सचे सहा खेळाडू दिसतात. यामध्ये साई सुदर्शन, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, मानव सुतार आणि गुरनूर ब्रार यांचा समावेश करण्यात आला आहे.

ऋषभ पंतच्या जागी के. एल. राहुल नवा उपकर्णधार

अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीच्या बैठकीत हा कठीण निर्णय घेण्यात आला. अनुभवी यष्टिरक्षक व फलंदाज के. एल. राहुलची ऋषभ पंतच्या जागी कसोटी संघाच्या नवीन उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वन डे संघामध्येही पंतचे नाव नाही. पंतच्या अनुपस्थितीत के. एल. राहुल आणि ईशान किशन एकदिवसीय संघात यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळतील.

रोहित आणि विराट संघात कायम...

हिंदुस्थान आणि अफगाणिस्तान यांच्यात द्विपक्षीय एकदिवसीय मालिका खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल. अनुभवी खेळाडूंचे पुनरागमन आणि नव्या चेहऱयांना संधी हे यावेळी हिंदुस्थानी संघात पाहायला मिळाले आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा हिंदुस्थानी एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे. हे दोन्ही खेळाडू बऱयाच काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नाहीत.

रवींद्र जाडेजाला कसोटी संघातून विश्रांती…

रवींद्र जाडेजा हा हिंदुस्थानच्या कसोटी संघातील महत्त्वाचा गोलंदाज होता. पण अष्टपैलू रवींद्र जाडेजाला या एकमेव कसोटी सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. जडेजाच्या जागी अक्षर पटेलला संधी देण्यात येत होती. पण या संघात जाडेजा तर नाहीच, पण अक्षरलाही संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.

मोहम्मद शमीला पुन्हा का डावलण्यात आले?…

मोहम्मद शमीचे संघात पुनरागमन होईल, असे सर्वांना वाटत होते. पण यावेळी हिंदुस्थानच्या कसोटी असो किंवा वन डे या दोन्ही संघांत शमीचे नाव नाही. शमीबाबत निवड समितीने सांगितले की, 'मोहम्मद शमी हा सध्या फक्त टी-20 क्रिकेटवर लक्ष केंद्रित करून असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे त्याचा कसोटी आणि वन डे संघासाठी विचार करण्यात आला नाही.'

आयपीएलमधील खेळाडूंचे नशीब उजळले

आयपीएल 2026 मध्ये चांगली कामगिरी करणाऱया युवा खेळाडूंना बक्षीस मिळाले आहे. गुजरात टायटन्सकडून खेळणारे फिरकी गोलंदाज मानव सुतार आणि वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार यांचा हिंदुस्थानच्या कसोटी संघात पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये छाप पाडणाऱया प्रिन्स यादवला एकदिवसीय संघात पहिल्यांदाच स्थान देण्यात आले आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय आणि कसोटी मालिकेसाठी हिंदुस्थानी संघ

कसोटी संघ – शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैसवाल, के. एल. राहुल (उपकर्णधार), साई सुदर्शन, ऋषभ पंत, देवदत्त पडिक्कल, नितीश कुमार रेड्डी,
वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मानव सुथार, गुरनूर ब्रार, ध्रुव जुरेल आणि हर्ष दुबे.

एकदिवसीय संघ – शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, ईशान किशन, हार्दिक पंडय़ा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, प्रिन्स यादव, गुरनूर ब्रार आणि हर्ष दुबे.

हिंदुस्थानने अखेरची मालिका कोणती खेळली होती...

हिंदुस्थानी संघाने आपली शेवटची कसोटी आणि एकदिवसीय मालिका गमावली आहे. गेल्या वर्षीच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने जिंकली होती. जानेवारीमध्ये पहिला सामना जिंकल्यानंतरही संघ न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका 2-1 ने हरला होता. हिंदुस्थानने आतापर्यंत अफगाणिस्तानविरुद्ध फक्त एकच कसोटी सामना खेळला असून चारपैकी तीन एकदिवसीय सामने जिंकले आहेत. चार एकदिवसीय सामन्यांमध्ये हिंदुस्थानने तीन जिंकले असून एक सामना बरोबरीत सुटला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana