Saturday, 28 Mar, 5.40 pm सामना

देश
उच्चशिक्षित तरुणाची 'कोरोना पसरवा, जग संपवा' पोस्ट; कंपनीने नोकरीवरून काढले, पोलिसांनी तुरुंगात टाकले

कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढत असून हिंदुस्थानात रुग्णांची संख्या 800 पार गेली आहे. मृतांचा आकडा देखील 20 च्या जवळ पोहोचला आहे. एकीकडे संपूर्ण जग कोरोनाचा सामना करत असताना काही समाजकंटक आपला वाईट मनसुबा दाखवत आहे. नुकतीच एका उच्चशिक्षित मुस्लिम तरुणाने कोरोना व्हायरस बाबत एक पोस्ट शेअर केली होती. यामुळे त्याला आपली नोकरी देखील गमवावी लागली आणि तुरुंगाची हवा देखील खावी लागली.

आयटी कंपनी इन्फोसिसमध्ये इंजिनिअर असणाऱ्या मुजीब मोहम्मद याने एक वादग्रस्त पोस्ट आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केली होती. 'चला सर्वांनी सोबत येऊ, लोकांमध्ये जाऊ शिंकूया, खोकूया आणि कोरोना पसरवूया', अशी पोस्ट मुजीब मोहम्मद याने केली होती. एका उच्चशिक्षित, इंजिनिअर असणाऱ्या तरुणाने अशी पोस्ट केल्याने खळबळ उडाली होती. तरुणावर सोशल मीडियावर प्रचंड टीका करण्यात आली. यानंतर हा तरुण इन्फोसिस या कंपनीत काम करत असल्याचे समोर आले. कंपनीने तात्काळ याची दखल घेत अशा विखारी विचारांच्या या तरुणाला नोकरीवरून काढून टाकले आहे. कंपनीने ट्विटरवर याची माहिती दिली आहे. तसेच सोशल मीडियावर कोरोना संक्रमण पसरवण्याबाबत लिखाण केल्याने त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

इन्फोसिसचे ट्विट
आम्ही आमच्या एका कर्मचाऱ्याच्या सोशल पोस्टची पडताळणी केली आहे. कर्मचाऱ्याची पोस्ट कंपनीचे नियम आणि सामाजिक जबाबदारीचे उल्लंघन करणारी आहे. त्यामुळे आम्ही झिरो टॉलरन्स पॉलिसीनुसार त्याला नोकरीवरून काढून टाकत आहोत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बंगळुरू येथील इन्फोसिस कार्यालयात एकाला कोरोना झाल्याचे निदान करण्यात आले होते. या नंतर कंपनीने तात्काळ हे कार्यालय मोकळे करून सॅनिटाईज केले होते. बंगळुरूमध्ये कंपनीचे 10 कार्यालय असून यापैकी एका कार्यालयात मुजीब मोहम्मद काम करत होता. आता त्याला नोकरीतुन बडतर्फ करण्यात आले असून त्याला अटकही झाली आहे.

जगभरात 27365 मृत्यू
दरम्यान, कोरोना व्हायरसच्या विळख्यात संपूर्ण जग अडकले असून 199 देशात हा व्हायरस पसरला आहे. जगभरात 27365 लोकांचा मृत्यू झाला असून दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. इटली, स्पेन आणि फ्रांस या देशात कोरोना व्हायरसमुळे 16267 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top