Dailyhunt
वाड्यातील 40 गावपाड्यांना भीषण पाणीटंचाईचे चटके; टँकरने पुरवठा करण्याची वेळ; जलजीवन मिशनचा उडाला बोजवारा

वाड्यातील 40 गावपाड्यांना भीषण पाणीटंचाईचे चटके; टँकरने पुरवठा करण्याची वेळ; जलजीवन मिशनचा उडाला बोजवारा

सामना 2 weeks ago

वाडा तालुक्यातील 40 गावपाड्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून पाणीटंचाईमुळे महिलांचे प्रचंड हाल होत आहेत. गेल्या दोन तीन वर्षांत तालुक्यातील प्रत्येक गावपाड्यात जलजीवन मिशन योजनेंतर्गत पाणी योजना मंजूर आहेत.

मात्र यातील बहुतांश योजना अर्धवट आहेत तर काही योजना सुरूच झालेल्या नाहीत. जलजीवन मिशनचा बोजवारा उडाल्याने तळपत्या उन्हात भीषण पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत असून नागरिकांच्या घशाला कोरड पडली आहे. पाणीटंचाईची झळ कमी करण्यासाठी प्रशासनाने काही गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे.

वाडा तालुक्यात करोडो रुपये खर्च करून पाणी योजना मंजूर केल्या. मात्र या निधीचा चुराडा झाला आहे. ठेकेदारांवर अधिकाऱ्यांचा अंकुश नसल्याने या योजना कागदावरच आहेत. अनेक गावपाड्यांत जलजीवन मिशन योजनांचा कालावधी संपला तरी पाणीपुरवठा योजना पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत. अनेक योजनांची कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. करोडो रुपये खर्च करूनही नागरिकांच्या नशिबी पाणीटंचाई पाचवीला पुजली आहे. पाणी योजनांचा पुरता फज्जा उडाल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी मायभागिनींच्या नशिबी दोन ते तीन किलोमीटरची पायपीट आली आहे.

दोन दिवसांतून एक टँकर

वाडा तालुक्यातील गावदेवीपाडा (सुपोंडे), वाघातपाडा, निसाळपाडा, पलाटपाडा (पाली), म्हसेपाडा (आमगाव), सुरुमपाडा, धावडपाडा, तुंबडापाडा (पिंपळास), नदीचापाडा (उमरोठे), कातकरी वाडी, खेत्रीपाडा, गवळीपाडा, खोरीपाडा, वडपाडा (पिंजाळ), सुतकपाडा (मांगरूळ), कातकरी वाडी (मांडवा), निहाळी, खैरपाडा, चिंचपाडा (शेले), धिंडेपाडा, डोंगरीपाडा (सासणे), गावठाणपाडा (वरसाळे), कातकरीवाडी, किन्हईपाडा (लखमापूर), गोठणीपाडा (जामघर), मार्गेपाडा (कोनसई), डोंगरीपाडा (तुसे), दंडाचा पाडा, हेदूचापाडा (मोज), कातकरीवाडी (बिलावली), फणसपाडा, घोडसाखरे, सागमाळ, जांभूळपाडा, बोरीचा पाडा, नवलेपाडा, भगतपाडा या गावपाड्यांना तीव्र टंचाई जाणवत असल्याने येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू केला असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली. अनेक गावांत दोन दिवसांतून एकच टँकर येत असल्याने पाणी मिळवण्यासाठी सर्वांची झुंबड उडते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana