Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वह्या, गणवेश, स्टेशनरीसाठी पालिकेची 157 कोटींची तरतूद; तीन कंत्राटदारांची नियुक्ती

वह्या, गणवेश, स्टेशनरीसाठी पालिकेची 157 कोटींची तरतूद; तीन कंत्राटदारांची नियुक्ती

सामना 4 months ago

15 जूनपासून शाळांची घंटा वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मोफत शालेय वस्तूंचे वाटप मिळावे यासाठी महापालिकेकडून खटाटोप सुरू झाला आहे.

वह्या, गणवेश, स्टेशनरी 15 दिवस आधी शालेय वस्तू उपलब्ध व्हाव्या यासाठी प्रशासनाकडून तीन कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. या शालेय वस्तूंसाठी महापालिकेकडून तब्बल 157 कोटींची तरतूद करण्यात आली असून 3 जून रोजी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या शाळांतील 1 ली ते 8 वीच्या वर्गांमध्ये एकूण 5 लाख 47 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2026-28 या दोन वर्षांसाठी वह्या, निबंध वही, चित्रकला वही, विज्ञान वही, आलेख वही तसेच नकाशे व आराखडा वह्यांचा पुरवठा करण्यासाठी सुमारे 21 कोटी 18 लाख 12 हजार 512 रुपयांचे कंत्राट देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटपासाठी 118 कोटी 66 लाख 32 हजार 770 रुपये आणि स्टेशनरी साहित्यासाठी 18 कोटी 3 लाख 82 हजार 970 रुपये खर्च करण्यात येणार आहे. गणवेश व शालेय वस्तूंचा प्रस्ताव बुधवार 3 जून रोजी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वेळेवर मिळणार का?

शाळा सुरू होण्याच्या 15 दिवस आधी शालेय वस्तू उपलब्ध व्हाव्यात यासाठी पालिकेने तीन कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. मात्र या वस्तू उपलब्ध करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाच्या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. 3 जून रोजी स्थायी समितीच्या बैठकीत यावर चर्चा होणार असल्याने यंदा तरी विद्यार्थ्यांना वेळेवर शालेय वस्तू मिळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana