Dailyhunt
वैष्णोदेवीहून परतत असताना धावत्या कारला आग, पाच जण जिवंत जळाले

वैष्णोदेवीहून परतत असताना धावत्या कारला आग, पाच जण जिवंत जळाले

सामना 2 weeks ago

वैष्णोदेवीहून परतत असताना धावत्या कारला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिला, एक पुरुष आणि एका मुलाचा समावेश आहे. राजस्थानमधील अलवर येथे दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

सर्व मयत मध्य प्रदेशातील श्योपूरचे रहिवासी होते.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील चैनपुरा गावातील हे कुटुंब वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेले होते. तेथून भाड्याच्या टॅक्सीने आपल्या गावी परतत होते. अलवर जिल्ह्यातील लक्ष्मणगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजपूरजवळ कारमधून सीएनजी गॅसची गळती झाल्याने गाडीला आग लागली. यात गाडीतील एकाच कुटुंबातील पाच जण जिवंत जळाले.

चालक विनोद कुमारने धावत्या गाडीतून उडी मारून आपला जीव वाचवला. मात्र, तो देखील अंदाजे 80 टक्के भाजला आहे. त्याला तात्काळ स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जयपूर येथील सवाई मानसिंग (एसएमएस) रुग्णालयात हलवण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच, लक्ष्मणगड पोलीस ठाणे, अग्निशमन दल आणि प्रशासनाची पथके घटनास्थळी दाखल झाली. आग विझवण्यासाठी दोन अग्निशमन गाड्या तैनात करण्यात आल्या. डीएनए चाचणीद्वारे मृतदेहांची ओळख पटवली जाईल. घटनास्थळी वैद्यकीय पथक आणि न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचे (FSL) पथक बोलावण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana