धारावी आणि मोतीलाल नगरपाठोपाठ आता वरळी आदर्श नगर आणि वांद्रे रिक्लेमेशन या मुंबईतील दोन महत्त्वांच्या प्रकल्पाचा पुनर्विकासदेखील अदानी समूहाकडे जाण्याची शक्यता आहे. समूह पुनर्विकासासाठी बांधकाम व विकास संस्था नियुक्त करण्यासाठी म्हाडामार्फत आर्थिक निविदा उघडण्यात आल्या.
दोन्ही प्रकल्प निविदेत अदानी प्रॉपर्टीजने बाजी मारली आहे. तसेच अंधेरी पश्चिम सरदार वल्लभभाई पटेल नगरच्या पुनर्विकासासाठी हनुरा रियल्टी, चांडक रियल्टर्स, प्रेमसागर इन्फ्रा रियल्टी, वॅनटियर रियल्टी यांचा समूह उच्चतम निविदाकार ठरला आहे. या तिन्ही प्रकल्पांसाठी निविदा स्वीकृतीचा प्रस्ताव म्हाडातर्फे उच्चाधिकार समितीकडे पाठविण्यात येणार आहे. या प्रस्तावाला उच्चाधिकार समितीच्या मान्यतेनंतर अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवण्यात येईल. त्यानंतर या विकासकांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल.
म्हाडाने बांधकाम व विकास संस्था याअंतर्गत मुंबईतील सुमारे 925 एकर क्षेत्रावर 11 महत्त्वाचे पुनर्विकास प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यापैकी 73.89 एकर जागेत वसलेल्या सरदार वल्लभभाई पटेल नगर, 98.27 एकर जागेत वसलेल्या वांद्रे रिक्लेमेशन आणि 34.33 एकर जागेवरील आदर्श नगर या प्रकल्पांच्या समूह पुनर्विकासासाठी 'कन्स्ट्रक्शन अॅण्ड डेव्हलपमेंट एजन्सी' नियुक्त करण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने एप्रिलमध्ये निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. आदर्श नगर या प्रकल्पासाठी अदानी प्रॉपर्टीज, लोढा डेव्हलपर्स आणि जेएसडब्ल्यू रिअल्टी अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर यांनी तर वांद्रे रिक्लेमेशनसाठी लोढा डेव्हलपर्स, अदानी प्रॉपर्टीज आणि जेएसडब्ल्यू रिअल्टी अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर या विकासक पंपन्यांनी तांत्रिक बोली सादर केल्या होत्या. तसेच सरदार वल्लभभाई पटेल नगर प्रकल्पासाठी रिलायन्स 4 आयआर रिअल्टी डेव्हलपमेंट लिमिटेड, अदानी प्रॉपर्टीज आणि हनुरा रिअल्टीने बोली सादर केल्या होत्या. निविदांची तांत्रिक पडताळणी केल्यानंतर आर्थिक निविदा उघडण्यात आल्या.
साडेसहा हजार रहिवाशांचे पुनर्वसन
वांद्रे रिक्लेमेशन प्रकल्पात 1147, आदर्श नगर प्रकल्पात 863 आणि सरदार वल्लभभाई पटेल नगर येथील 4584 रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. पात्र रहिवाशांना संक्रमण काळात भाडे तसेच देखभालीसाठी कॉर्पस निधीची तरतूद आहे. जागतिक दर्जाच्या आधुनिक पायाभूत सुविधा देणे बंधनकारक आहे.

