अलिबाग येथील अवघ्या ७ वर्षांच्या सारा वर्तक हिने आपल्या जिद्द आणि धैर्याच्या जोरावर जागतिक स्तरावर नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. ९ डिसेंबर २०२५ रोजी साराने अरबी समुद्रात धरमतर जेट्टी ते गेट वे ऑफ इंडिया हे अत्यंत आव्हानात्मक तब्बल ३६ किलोमीटर अंतर एकट्याने अवघ्या ९ तास ३२ मिनिटांत पोहत पूर्ण करत सर्वात लहान वयाची जलतरणपटू म्हणून इतिहास रचला.
आता तिच्या या पराक्रमाची दखल ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन यांनी घेतली आहे.
३० एप्रिल २०२६ रोजी नेपाळमधील काठमांडू येथे आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार समारंभात साराला ‘धरमतर जेट्टी ते गेट वे ऑफ इंडिया हे ३६ किमी अंतर पोहून पूर्ण करणारी सर्वात लहान हिंदुस्थानी जलतरणपटू’ म्हणून अधिकृत नोंद करून गौरवण्यात आले. तिच्या या यशामागे तिची चिकाटी, सातत्यपूर्ण सराव आणि प्रशिक्षक ऋग्वेद पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. सारा ही सध्या पनवेल येथे राहत असून प्रशिक्षक ऋग्वेद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ती प्रशिक्षण घेत आहे. भविष्यात आणखी मोठ्या स्पर्धांमध्ये देशाचे नाव उज्ज्वल करण्याचा तिचा निर्धार आहे.

