Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वसईतील गोळीबार प्रकरण, तुळशी रिसॉर्टच्या मालकाविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

वसईतील गोळीबार प्रकरण, तुळशी रिसॉर्टच्या मालकाविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

सामना 6 days ago

विना परवाना बार सुरू करून मद्यविक्री केल्याप्रकरणी वसई तालुक्यातील तुळशी रिसॉर्टच्या मालकाविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकुर अनिल मेहेर (31) असे गुन्हा दाखल केलेल्या मालकाचे नाव आहे.

अर्नाळा सागरी पोलिसांनी मेहेरविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 292, 223 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 140 अन्वये गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 जुलै रोजी रात्री सुमारे 1.30 वाजण्याच्या सुमारास कळंब येथील तुळशी रिसॉर्टवर छापा टाकण्यात आला. यावेळी रिसॉर्टमध्ये कोणतीही वैध नोंदणी अथवा आवश्यक परवानग्या नसताना बार सुरू करून ग्राहकांना मद्य पुरवले जात असल्याचे निदर्शनास आले होते. या कारवाईदरम्यान रिसॉर्टमध्ये पाच पुरुष आणि एक महिला मद्यपान करताना आढळून आले होते. रिसॉर्टमध्ये बेकायदेशीर मद्यविक्री केली जात असल्याचा आरोपही पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली.

प्रकरण काय?

भिवंडी तालुक्यातील कवाडखुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच मयुरी गुरव यांचा पती संदेश गुरव (32) हा आपल्या मित्रांसह पार्टीसाठी तुळशी रिसॉर्टमध्ये आला होता. संदेश गुरव हा बांधकाम साहित्य पुरवठ्याचा व्यवसाय करतो. मध्यरात्री सुमारे दीडच्या सुमारास दारूच्या नशेत आणि अतिउत्साहाच्या भरात संदेश गुरव याने स्वतःकडील बेकायदेशीर गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केला. गोळीबारामुळे रिसॉर्ट परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे बीट मार्शल समुद्रकिनारा परिसरात गस्त घालत होते. गोळीबाराचा आवाज ऐकताच त्यांनी तातडीने तुळशी रिसॉर्टकडे धाव घेतली आणि अर्नाळा सागरी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी तपास केला असता त्यांना वापरलेल्या काडतुसाची रिकामी भोंगळी आढळली. अधिक चौकशी केल्यानंतर आरोपी संदेश गुरव याच्याकडून बिनपरवान्याचा गावठी रिव्हॉल्व्हर आणि आणखी जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी गुरव याला ताब्यात घेतले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana