Saturday, 25 Sep, 6.00 am सामना

ठळक
वेब न्यूज - 'सत्य परेशान.'

>> स्पायडरमॅन

'सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं'; सध्या हे वाक्य प्रचंड चर्चेत आहे, असे म्हणायला हरकत नाही. आपण बरेचदा चार्जिंला लावलेला मोबाईल अचानक फुटल्याचे किंवा खिशात, पर्समध्ये ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाल्याचे किस्से अधे मधे ऐकत असतो. या घटनांत पुढे नक्की काय होते, हेदेखील आपल्यापर्यंत पोहोचत नाही, मात्र दिल्लीतल्या एका वकिलाने मात्र आता त्याच्यासोबत घडलेल्या अशाच एका दुर्घटनेची बित्तंबातमी आणि त्याचे अपडेट सतत लोकांपर्यंत पोहोचवण्याचे ठरवले आहे. दिल्लीतील वकील असलेल्या गौरव गुलाटी यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरवर आपल्या 'OnePlus Nord 2 5G' या मोबाईलचे फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये हा मोबाईल जळालेल्या अवस्थेत दिसत होता. 'आपण भरकोर्टाच्या चेंबरमध्ये असताना या मोबाईलचा आपल्या खिशात अचानक स्फोट झाला आणि त्यामुळे आपला ड्रेसदेखील जळाला' असा दावा या फोटोंना शेअर करताना वकील साहेबांनी केला होता, मात्र आता या वनप्लस मोबाईलला आग लागल्याचा दावा करणाऱया वकिलाला या मोबाईलच्या उत्पादक कंपनीने कायदेशीर नोटीस बजावली आहे.

`cease and desist' प्रकारातली ही नोटीस असून, एखाद्या व्यक्तीला तो करत असलेली बेकायदेशीर कृत्ये थांबवण्यासाठी अशा प्रकारची नोटीस बजावली जाते. वनप्लस या उत्पादक कंपनीच्या संदर्भात कंपनीच्या अब्रूला धक्का पोहोचविणारे असे व्हिडीओ बनवून ते प्रसिद्ध करण्यास तसेच कंपनीसंदर्भात कोणतीही अपमानास्पद टिपणी करण्यासदेखील हरकत घेण्यात आलेली आहे. त्याचबरोबर यापूर्वी प्रकाशित केलेला मजकूरदेखील हटवण्यास सांगण्यात आले आहे. 'सत्य परेशान…' या शीर्षकाखाली वकीलसाहेबांनी ही नोटीस ट्विटरवरती प्रसिद्ध केली आणि पुन्हा एकदा हे प्रकरणच जोमाने चर्चेत आले आहे. वकील या दुर्घटना प्रकरणाच्या चौकशीत कोणतेही सहकार्य करण्यास तयार नसल्याचा दावा कंपनीने केला आहे. आता या प्रकरणातले सत्य नक्की काय आहे ते येणारा भविष्यकाळ सांगेल, मात्र सध्या नेटकरी फुकटात मनोरंजन करून घेत आहेत येवढे नक्की!

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top