Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वेंगसरकर अकादमीच्या आरुष कोल्हेची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड

वेंगसरकर अकादमीच्या आरुष कोल्हेची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड

सामना 3 weeks ago

मुंबईतल्या ओव्हल मैदानावर सकाळी चेंडूचा आवाज वेगळाच असतो. एका बाजूला लोकलची धडधड, दुसऱ्या बाजूला समुद्राची हवा आणि मधे स्वतःची स्वप्नं घामाने भिजवत धावणारी पांढऱ्या गणवेशातील मुले.

त्या गर्दीतला एक चेहरा आता थेट इंग्लंडच्या क्रिकेटविश्वात पाऊल ठेवणार आहे. तो म्हणजे दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीचा आरुष कोल्हे.

अवघ्या बाराव्या वर्षापासून क्रिकेटच्या मैदानात फलंदाजीचे धडे गिरवणारा आणि वेंगसरकर क्रिकेट अकादमीत घडलेला हा मुलगा आता 31 मे ते 2 जुलैदरम्यान इंग्लंडमध्ये 'क्रिकेट बियॉण्ड बाउंडरीज'च्या विशेष क्रिकेट आणि शैक्षणिक दौऱ्यावर जाणार आहे. डरहॅम स्कूलसारख्या तब्बल सहाशे वर्षांची परंपरा असलेल्या प्रतिष्ठत संस्थेत राहून तो क्रिकेटची नवी अक्षरं गिरवणार आहे.

आरुषसाठी ही केवळ टूर नाही, तर आयुष्याचा मोठा टार्ंनग पॉइंट आहे. डरहॅम काउंटी अंडर-17, एमसीसी आणि नामांकित शाळांविरुद्ध दहापेक्षा अधिक सामने खेळण्याची संधी म्हणजे तरुण क्रिकेटपटूसाठी सोन्याहून पिवळं. क्लब क्रिकेट, अकादमी सामने आणि इंग्लिश वातावरणाचा अनुभव त्याच्या क्रिकेटला नवी धार देणार आहे. मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवड समितीने त्याला लवकरच 16 वर्षांखालील संघात संधी दिली आणि आरुषनेही सातत्यपूर्ण कामगिरीने त्यांचा विश्वास सार्थ ठरवला. नुकत्याच झालेल्या कल्पेश कोळी स्पर्धेत 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' ठरत त्याने स्वतःची छाप उमटवली.

दिलीप वेंगसरकर फाउंडेशन आणि डॉ. समीर पाठक यांच्या 'क्रिकेट बियॉण्ड बाउंडरीज' या ट्रस्टमधील सहकार्यामुळे हिंदुस्थान आणि इंग्लंडमधील तरुण क्रिकेटपटूंना नवा दुवा मिळाला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana