Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
विद्यार्थ्यांना तुमच्या माफीची गरज नाही, उलट मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींची पोस्ट, NEET पीडितांच्या कुटुंबियांची घेतली भेट

विद्यार्थ्यांना तुमच्या माफीची गरज नाही, उलट मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींची पोस्ट, NEET पीडितांच्या कुटुंबियांची घेतली भेट

सामना 1 week ago

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी NEET परीक्षेच्या पार्श्वभूमीवर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या भेटीनंतर त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

“हिंदुस्थानमधील विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, उलट पंतप्रधानांनीच विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे,” अशा शब्दांत राहुल गांधी यांनी आपला संताप व्यक्त केला.

प्रत्येक तरुणाच्या निधनानंतर मागे एक असे कुटुंब राहते ज्यांचे दुःख कधीही संपत नाही, असे म्हणत राहुल गांधी यांनी ढासळलेल्या आणि भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. पेपर लीक होतात, परीक्षा रद्द होतात आणि अनेक वर्षांची मेहनत एका रात्रीत पाण्यात जाते. आपल्या विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे मेहनत करायला सांगितली जाते. पण ज्या व्यवस्थेत ते मेहनत करत आहेत, ती व्यवस्थाच त्यांच्याशी प्रामाणिक नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या एका व्हिडिओचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदी विद्यार्थ्यांना ‘माफ करण्याची’ भाषा करत आहेत. मात्र, त्यांनी आजपर्यंत अशा एकाही पालकाची भेट घेतलेली नाही ज्यांनी आपला मुलगा किंवा मुलगी गमावली आहे. तसेच पेपरफुटीमुळे ज्यांचे भविष्य उद्ध्वस्त झाले, अशा एकाही विद्यार्थ्यासोबत पंतप्रधान बोलले नाहीत. विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही उलट पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

आपल्या पाल्याला गमावलेल्या पालकांचे अश्रू आणि त्यांचा आक्रोश यापेक्षा मोठे दुःख दुसरे नाही, असे सांगत राहुल गांधी यांनी सवाल केला. ज्यांची आयुष्यभराची पुंजी, वेळ आणि स्वप्ने या पेपरफुटीने हिरावून घेतली गेली, त्या पीडित कुटुंबांना पंतप्रधान कधी भेटले आहेत का? याचे उत्तर ‘नाही’ असेच आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना माफ करण्याची गोष्ट न करता, या भ्रष्ट व्यवस्थेची जबाबदारी घेऊन देशातील विद्यार्थ्यांची स्वतः माफी मागायला हवी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana