Dailyhunt
विजय यांचा सत्तेसाठी दावा, राज्यपालांना हवे 118 आमदारांचे पत्र

विजय यांचा सत्तेसाठी दावा, राज्यपालांना हवे 118 आमदारांचे पत्र

सामना 1 week ago

काँग्रेसचा हात मिळताच टीव्हीकेचे नेते विजय यांनी आज राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे तामीळनाडूत सत्तास्थापनेचा दावा केला. यावेळी राज्यपालांनी बहुमतासाठी आवश्यक 118 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र मागत सत्ता स्थापनेचे आमंत्रण टाळले.

त्यामुळे उद्याच्या शपथविधीबाबत साशंकता आहे.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अभिनेते विजय यांच्या तमिळगा वेट्री कळघम (टीव्हीके) पक्षाने 108 जागा जिंकल्या. 234 जागांच्या विधानसभेत बहुमतासाठी 118 जागांची गरज आहे. काँग्रेसने पाठिंबा दिल्यामुळे टीव्हीकेचा आकडा 113 झाला आहे. मात्र, विजय दोन मतदारसंघातून जिंकल्यामुळे एक जागा कमी होणार आहे. तसेच, बहुमत सिद्ध करताना विधानसभा अध्यक्षांना मत देता येणार नाही. त्यामुळे टीव्हीकेला आणखी सात जागांची आवश्यकता आहे. राज्यपालांनी नेमके यावरच बोट ठेवल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे आता विजय यांना आकडयांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. आज मध्यरात्रीपर्यंत छोटय़ा पक्षांचा पाठिंबा मिळाल्यास 7 मे रोजी विजय मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तशी तयारी त्यांच्या पक्षाने केली आहे.

अण्णा द्रमुक फुटणार?

टीव्हीकेला पाठिंबा देण्यावरून अण्णा द्रमुकमध्ये दोन गट पडले आहेत. अण्णा द्रमुकच्या 47 पैकी 30 आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा देण्यास अनुकूलता दर्शवली आहे. तर, अण्णा द्रमुक कोणत्याही परिस्थितीत टीव्हीकेला पाठिंबा देणार नाही असे पक्षाचे ज्येष्ठ नेते मुनुसामी यांनी स्पष्ट केले आहे. पक्षाचे प्रमुख ई. पलानीस्वामी यांनी अद्याप मौन बाळगले आहे. त्यामुळे अण्णा द्रमुकमध्ये फूट पडण्याची चिन्हे आहेत.

विजय यांच्यापुढे अनेक पर्याय

तामीळनाडू विधानसभा निवडणुकीत टीव्हीकेच्या खालोखाल द्रमुकने 59 तर, अण्णाद्रमुकने 47 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसकडे 5, पीएमके 4, माकप 2, भाकप 2, व्हीसीके 2, मुस्लिम लीगकडे 2 जागा आहेत. तर, डीएमडीके, एएमएमके आणि भाजपकडे प्रत्येकी एक जागा आहे. द्रमुकच्या विरोधातच विजय यांनी निवडणूक लढवल्याने त्यांच्या पाठिंब्याचा प्रश्नच उद् भवत नाही. टीव्हीकेची विचारधारा सेक्युलर आहे. त्यामुळे भाजपसोबत असलेल्या अण्णाद्रमुकच्या पाठिंब्याचा पर्यायही बाद झाला आहे. मात्र, इतर छोटय़ा पक्षांचे अनेक पर्याय विजय यांच्यापुढे आहेत.

द्रमुक-अण्णाद्रमुक एकत्र येणार?

विजय यांना सत्तेपासून रोखण्यासाठी तामीळनाडूत पडद्यामागे मोठय़ा हालचाली सुरू आहेत. द्रमुक आणि अण्णाद्रमुक या कट्टर विरोधी पक्षांनी वैर बाजूला सारून एकत्र येण्यासाठी चाचपणी सुरू केल्याचे वृत्त समोर आले आहे. अण्णाद्रमुकमधील वरिष्ठ नेत्यांनी त्याला दुजोरा दिला. विजय यांच्या टीव्हीकेला 108 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसच्या पाच आमदारांच्या पाठिंब्यामुळे हे संख्याबळ 113 इतके झाले आहे. तरीही बहुमतासाठी 5 जागा कमी आहेत. दुसरीकडे द्रमुकला 59 तर अण्णाद्रमुकला 47 जागा मिळाल्या आहेत. त्यांची बेरीज 106 होते. या स्थितीत अण्णाद्रमुकसोबत युती असलेल्या भाजपचा एक आमदार कोणती भूमिका घेणार, उरलेले 14 आमदार कोणाकडे झुकणार, यावर सत्तेचा खेळ ऐन वेळी पालटण्याची शक्यता आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana