Dailyhunt
विखे पाटलांना फडणवीसांच्या पोलिसांवर भरवसा नाय काय; गोदावरी खोरे महामंडळाच्या बैठकीला बंदोबस्तासाठी चक्क बाऊन्सर्स!

विखे पाटलांना फडणवीसांच्या पोलिसांवर भरवसा नाय काय; गोदावरी खोरे महामंडळाच्या बैठकीला बंदोबस्तासाठी चक्क बाऊन्सर्स!

सामना 1 week ago

राज्याचे जलसंपदामंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांचा आपल्याच गृहमंत्र्यांवर विश्वास नाही! त्यामुळे गोदावरी खोरे महामंडळाच्या बैठकीला चक्क बाऊन्सर्सचा बंदोबस्त लावण्यात आला होता.

विशेष म्हणजे या बाऊन्सर्सनी पोलिसांनाही बाहेर हाकलले. शेतकऱ्यांना आत जाण्यापासून रोखले. बाऊन्सर्सची रखवाली करणाऱ्या पोलिसांनी आपला राग पत्रकारांवरच काढला.

राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दोन दिवस जिल्हयाच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी गोदावरी खोरे विकास महामंडळाच्या विभागीय कार्यालयात नियामक मंडळाची बैठक बोलावली होती. अत्यंत संतापजनक म्हणजे या बैठकीला चक्क खासगी बाऊन्सर्सचा बंदोबस्त लावण्यात आला होता. शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, पत्रकार या बैठकीकडे फिरकू नयेत यासाठी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी हा खटाटोप केला. महामंडळाच्या सभागृहाकडे जाणाऱ्या संपूर्ण परिसराचा ताबा बाऊन्सर्सकडे देण्यात आला होता. चिटपाखरूही सभागृहाकडे फिरकू नये याची काळजी घेण्यात आली होती. माजलगावचे काही वयोवृद्ध शेतकरी विखे पाटलांना भेटण्यासाठी आले, या शेतकऱ्यांचा बाऊन्सर्सनी अतिशय घाणेरड्या शब्दांत अपमान करून त्यांना हाकलले.

पत्रकारांनाही अपमानास्पद वागणूक गोदावरी खोरे नियामक मंडळाच्या बैठकीचे वृत्तांकन करण्यासाठी पत्रकारही आले होते. मात्र आत बाऊन्सर्स आणि बाहेर पोलिसांनी पत्रकारांना अतिशय अपमानास्पद वागणूक दिली. जवाहरनगर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक आतिश लोहकरे हे तर भाजप कार्यकर्त्याच्या भूमिकेतच बंदोबस्तावर आले होते. या लोहकरेंनी पत्रकारांना थेट गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.

भाजप कार्यकर्त्यांना मात्र मुक्त प्रवेश

शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, पत्रकारांना बैठकीपासून दूर ठेवण्यात आले. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांना या बैठकीसाठी मुक्त प्रवेश होता. एवढेच काय, पोलीस आणि महामंडळाचे अधिकारीच बंदोबस्तात भाजप कार्यकर्त्यांना आत घेऊन जात होते.

महामंडळाच्या कारभारात भाजपचा हस्तक्षेप

गेल्या काही महिन्यांपासून गोदावरी खोरे महामंडळाच्या जालना रोडवरील कार्यालयात भाजपचे सटरफटर नेते, कार्यकर्त्यांची उठबस वाढली आहे. काही नेते तर महामंडळाच्या कारभारात थेट हस्तक्षेप करत असल्याचीही माहिती आहे. महामंडळातील काही अधिकारी, कर्मचारी सरकारचा पगार घेऊन भाजपची चाकरी करत असल्याच्याही तक्रारी आहेत.

बाऊन्सर्स कुणी आणले, मला माहिती नाही! कार्यकारी संचालक संतोष कानावर हात

बैठक संपल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील बाहेर आले असता पत्रकारांनी त्यांना हा सगळा अरेरावी, अपमानास्पद वागणुकीचा प्रकार सांगितला. त्यावर विखे पाटलांनी चक्क कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांच्याकडे बोट दाखवले. ‘यानंतर असे होणार नाही’ असे म्हणत विखे पाटील तेथून पळाले. यासंदर्भात तिरमनवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बाऊन्सर्स कुणी आणले हे मला माहिती नसल्याचे सांगत कानावर हात ठेवले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana