Dailyhunt
विरारकरांचा पारा चढला, ऐन गर्दीच्या वेळची लोकल 'एसी' केल्याने संतप्त प्रवाशांचा रेल रोको

विरारकरांचा पारा चढला, ऐन गर्दीच्या वेळची लोकल 'एसी' केल्याने संतप्त प्रवाशांचा रेल रोको

सामना 1 week ago

विरार रेल्वे स्थानकातून सुटणारी सकाळी 8 वाजून 28 मिनिटांची चर्चगेट लोकल पश्चिम रेल्वे प्रशासनाने अचानक एसी केल्याने विरारकरांचा आज पारा चढला. ऐन गर्दीच्या वेळची ही सामान्य लोकल 'एसी' झाल्यामुळे संतप्त प्रवाशांनी रुळावर उतरून रेल रोको करत ही गाडी अडवून धरली.

या आंदोलनामुळे सकाळी पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून पडले. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

रेल्वे प्रशासनाने बुधवारी एक सूचना जारी करून शुक्रवारपासून 8.28 ची चर्चगेट लोकल एसी करण्याचे जाहीर केले होते. मात्र या निर्णयामुळे दैनंदिन प्रवाशांचे गणित कोलमडले आहे. सकाळची 8.28ची गाडी ही नोकरदार आणि विद्यार्थ्यांसाठी सोयीची होती. तीच गाडी बदलल्याने आता इतर गाडय़ांवरील भार वाढला आहे.

सकाळी 8.28ची चर्चगेट लोकल ही एसी चालवण्यात येणार असल्याची उद्घोषणा झाल्यानंतर प्रवाशांचा संताप अनावर झाला. त्यानंतर संतप्त प्रवाशांनी रुळावर उतरून रेल रोको केला.

प्रवाशांचे अचानक आंदोलन सुरू झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. रेल्वेचे अधिकारीही फलाटावर आले. त्यानंतर प्रवाशांनी आपले आंदोलन मागे घेतले.

दर आवाक्याबाहेर

एसी लोकलचे तिकीट दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीत. त्यामुळे या लोकल सेवेला प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. प्रथम श्रेणीचा पास असलेल्या प्रवाशांनाही या एसी लोकलमधून प्रवास करता येत नाही. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी एसी लोकल चालवली गेली तर सामान्य गाडय़ांवर प्रवाशांचा मोठा ताण येतो, अशी प्रतिक्रिया प्रवासी संघटनांनी व्यक्त केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana