पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला आहे. भाजपची पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये सत्ता येत आहे. निवडणूक निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये कोणतीही भाजप आणि तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये कोणताही अनुचीत प्रकार घडू नये, यासाठी निडणूक आयोगाने काही महत्त्वाचे निर्णय आधीच घेतले आहेत.
पश्चिम बंगालमध्ये सर्व प्रकारच्या विजयी रॅलीवर बंदी घालण्यात आली आहे.
पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात निवडणुका पार पडल्या असून सोमवारी निकाल जाहीर झाला आहे. परंतु, निकालानंतर कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला विजय साजरा करण्यासाठी रॅली काढण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कोणत्याही विजयी उमेदवाराला आपल्या मतदारसंघात विजयी मिरवणूक काढायची असेल त्यांनी 5 मे 2026 नंतर मिरवणूक काढावी, असे कोलकाता पोलिसांनी सांगितले आहे. मिरवणुकीसाठी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असेल, मिरवणुकीसाठी परवानगी मिळाली तरीही सर्व नियम व अटींचे काटेकोर पालन करावे लागेल, असे पोलिसांनी दिलेल्या नोटिसीत म्हटले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी अरिंदाम नियोगी यांनी म्हटले आहे.

