पश्चिम बंगालमध्ये भाजपने दोनशेहून अधिक जागांवर विजय मिळवला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा देखील भवानीपूर मतदारसंघातून पराभव झाला आहे. ममता बॅनर्जी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांना मारहाण झाल्याचा गंभीर आरोप देखील केला आहे.
यावरून उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व समाजवादी पार्टीचे खासदार अखिलेश यादव यांनी सत्ताधाऱ्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ”सत्ताधारी राजकारणाला पाताळापेक्षा खालच्या दर्जाला घेऊन जाणार का?”, असा सवाल अखिलेश यादव यांनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमधून केला आहे. तसेच त्यांनी आजच्या दिवसाला देशाच्या राजकीय इतिहासातील काळा दिवस देखील म्हटले आहे.
”सत्ताधारी पक्ष आता राजकारणाला अगदी पाताळापेक्षा खालच्या दर्जाला घेऊन जाणार आहे का? आजचा दिवस देशाच्या राजकीय इतिहासातील हा एक घनघोर ‘काळा दिवस’ ठरला आहे. आज संपूर्ण देश आक्रोश करतोय आणि लोकशाही व्यथित झाली आहे”, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.
निवडणूक व्यवस्थेच्या नावावर आज बंगालमध्ये केंद्रीय दलांचा उघडपणे गैरवापर झाला आहे. जो असाच गैरप्रकार जो २०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांदरम्यान बहुतांश मतदारसंघांमध्ये घडला होता आणि या वास्तवाचे कन्नौजमधील विधानसभा मतदारसंघांनी याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला होता. त्यानंतर, २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ‘फर्रुखाबाद’ येथेही नेमक्या याच निंदनीय कार्यपद्धतीची पुनरावृत्ती करण्यात आली”, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे.
”काय घडले आहे, सत्य काय आहे आणि जनतेचा कौल कशा प्रकारे उघडपणे लुटला गेला आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. अत्यंत, अत्यंत, अत्यंत निषेधार्ह”, असे देखील त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

