Sunday, 25 Aug, 3.40 am सामना

विदेश
यूएईमध्ये मोदींचा सन्मान, जळफळाट झालेल्या पाकिस्तानने घेतला आक्षेप

'ऑर्डर ऑफ जाएद' या युनायटेड अरब अमिरात (यूएई) देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शनिवारी यूएईचे संस्थापक शेख जाएद बिन सुल्तान अल नहयान यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यूएईमधील मोदींच्या सन्मानामुळे पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. 370 कलम रद्द करण्याच्या निर्णयावर पाकिस्तान जगभरातील मुस्लीम देशांना एकत्र येण्याचे आवाहन करत असतानाच यूएईने मोदींना हा सन्मान दिल्याने पाकिस्तानला मोठाच झटका बसला.

यूएईने मोदींचा सन्मान केल्यानंतर काहीच तासांनी पाकिस्तानी सीनेटचे चेअरमन सादिक सनर्जानी यांनी यूएईचा आपला दौरा रद्द केला आहे. जम्मू-कश्मीरमधून 370 रद्दबातल करण्याचा निर्णय मोदींनी घेतला. यामुळे कश्मीरमधील मुसलमानांसोबत अन्याय झाला आहे आणि त्या मोदींनाच यूएईने आपला सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरवान्वित केले. त्यामुळे यूएईच्या दौऱ्यावर जाणे म्हणजे कश्मीरी माता, बहिणी आणि मुसलमानांवर अत्याचार केल्यासारखे होईल, असे सादिक यांनी दौरा रद्द केल्याची माहिती देताना म्हटले.

पाकिस्तानी पत्रकाराचा आक्रोश
पाकिस्तानचे ज्येष्ठ पत्रकार हामिद मीर यांनी मोदींना यूएईचा सर्वोच्च पुरस्कार देण्याच्या निर्णयावर ट्वीट केले आहे. संयुक्त अरब अमीराने मोदींना सर्वोच्च पुरस्कार देण्याच्या निर्णयावर जगातील मोठमोठे मुस्लीम नेते शांत आहेत. परंतु ब्रिटीश खासदार नाज शाह यांनी यावर आक्षेप नोंदवला. पाकिस्तान आणि कश्मीरी लोकांच्या भावना नाज यांनी मांडल्या. नाज यांचे धन्यवाद, अस ट्वीट हामिद मीर यांनी केले.

'डॉन'मध्ये वृत्त

मोदींना 'ऑर्डर ऑफ जाएद'ने सन्मान मिळाल्यानंतर पाकिस्तानचे प्रमुख वृत्तपत्र 'डॉन'ने याबाबत बातमी दिली आहे. मोदींना ऑर्डर ऑफ जाएद' हा सन्मान दिल्यामुळे यूएईसाठी हिंदुस्थान किती महत्त्वाचा आहे हे दिसून येते. हिंदुस्थान कच्चे तेल आयात करणारा तिसरा सर्वात मोठा देश आहे. सर्वात मोठी बाजारपेठ असणारा देश हिंदुस्थान आहे. तसेच यूएईमध्ये मोठ्या संख्येने हिंदुस्थानी लोक काम करतात.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top