Dailyhunt
युवासेनेची मावळ तालुक्यातील तोलानी इन्स्टिट्यूटवर धडक; खांब कोसळून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबास न्याय मिळवून देणार

युवासेनेची मावळ तालुक्यातील तोलानी इन्स्टिट्यूटवर धडक; खांब कोसळून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबास न्याय मिळवून देणार

सामना 1 day ago

मावळ तालुक्यातील इंदोरी येथील तोलानी मेरीटाईम इन्स्टिट्यूटच्या आवारात बास्केटबॉल खेळताना लोखंडी खांब (पोस्ट) अंगावर कोसळून वीस वर्षीय विशाल वर्मा (रा. आयोध्या, उत्तर प्रदेश) या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

इन्स्टिट्यूट प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेनेने इन्स्टिट्यूटवर धडक देत प्रशासनास धारेवर धरले. प्रशासनाने याप्रकरणी दिलगिरी व्यक्त करत अशा घटना भविष्यात पुन्हा होऊ देणार नाही, मृत विद्यार्थ्यांच्या परिवारास सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही दिली.

रविवारी (दि.५) विद्यार्थी इन्स्टिट्यूटच्या आवारात बास्केटबॉल खेळत होते. यावेळी पोस्ट अंगावर कोसळल्याने विशालचा मृत्यू झाला. या घटनेची दखल घेत शिवसेनेचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने व युवासेना सचिव, आमदार वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेने तोलानी मेरीटाईम इन्स्टिट्यूटवर धडक दिली. बास्केटबॉल स्टॅण्डची सुव्यवस्था तपासणी का करण्यात आली नव्हती?, आपत्कालीन परिस्थितीतील वैद्यकीय सेवेचा अभाव, कॅम्पसच्या मैदानात नियमानुसार सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, सदरच्या घटनेचे फुटेज उपलब्ध नाही यावरून प्रशासनास धारेवर धरले. यावेळी प्रशासनाने दिलगीर व्यक्त करत अशा घटना पुन्हा होऊ देणार नाही व मृत विद्यार्थ्यांच्या परिवारास सर्वतोपरी सहकार्य करू, पोलिसांमार्फत होणाऱ्या तपासात पारदर्शकपणे सहकार्य करू, ज्या विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या चुका निदर्शनास आणून दिल्या त्यांना कोणत्याही पद्धतीने त्रास दिला जाणार नसल्याचे आश्वासन दिले.

युवा सेना विस्तारक नीलेश वसंतराव बडदे, जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख राजेंद्र मोरे, तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, महिला संघटिका शैला खंडागळे, युवासेना उपशहर अधिकारी निखिल दळवी, प्रसाद जठार, तालुकाप्रमुख उमेश गावडे यावेळी उपस्थित होते.

इन्स्टिट्यूटवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

इन्स्टिट्यूटच्या प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली आहे. त्यामुळे कॉलेज प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी युवासेनेतर्फे करण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले. याप्रकरणी सखोल चौकशी करून विशालच्या पालकांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana