कोलकाता (बंगाल) - आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक खाते ही कागदपत्रे एखाद्या व्यक्तीच्या भारतीय नागरिकत्वाचा अंतिम किंवा ठोस पुरावा मानली जाऊ शकत नाहीत, असे कोलकाता उच्च न्यायालयाने एका सुनावणीत स्पष्ट केले.
न्यायालयाने म्हटले की, या कागदपत्रांचा उपयोग केवळ ओळख पटवण्यासाठी, आर्थिक व्यवहारांसाठी किंवा सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी केला जातो. यामुळे एखाद्या व्यक्तीला थेट भारताचे नागरिकत्व मिळत नाही. पारपत्र अधिनियम आणि नागरिकत्व कायद्यांतर्गत नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी ही कागदपत्रे पुरेशी ठरत नाहीत. जर एखाद्या व्यक्तीच्या नागरिकत्वावर प्रश्न उपस्थित झाला असेल, तर त्याला वैध प्रक्रियेद्वारे नागरिकत्व सिद्ध करावे लागेल.

