अमरावती - मेळघाटातील कोरकू भाषिक विद्यार्थ्यांना मराठी शिकतांना भाषेची अडचण येऊ नये आणि वर्गातील शिक्षक विद्यार्थ्यांचा संवाद हिंदीऐवजी थेट मराठीत व्हावा अन् विद्यार्थ्यांच्या मातृभाषेचाच आधार घ्यावा, या उद्देशाने चिखलदरा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 'अरीटे इठूबा' अर्थात् 'आनंदाने शिकूया' या बहुभाषिक शिक्षण केंद्राचा प्रारंभ करण्यात आला आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मराठी भाषा आणि शिक्षकांनाही कोरकू भाषा शिकता येणार असून संवाद परिणामकारक होईल. हा उपक्रम जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या आयुक्त संजीता महोपात्रा यांच्या संकल्पनेतून अन् 'क्वेस्ट' संस्थेच्या माध्यमातून साकार झाला.
१. फळा, दप्तर, पुस्तक, दिनदर्शिका, आरसा, कंगवा, खिडकी आणि झाडे अशा दैनंदिन वापरातील वस्तूची नावे कोरकू अन् मराठी अशा भाषांमध्ये आकर्षक फलकांद्वारे वर्गात प्रदर्शित केली आहेत. यामुळे विद्यार्थी मराठी शब्द आत्मसात करत आहेत, तर शिक्षकांनाही कोरकूचे ज्ञान मिळत आहे.
२. यासाठी 'टाटा ट्रस्ट', 'इंदिरा फाउंडेशन' आणि 'मोटिव्हेशन फॉर एक्सलन्स' या संस्थांचे आर्थिक सहकार्य लाभले आहे. 'क्वेस्ट'मुळे मेळघाटातील शिक्षण क्षेत्राला दिशा मिळेल, असा विश्वास आहे.

