'मी गेल्या २५ वर्षांपासून धर्मरक्षणाचे कार्य करत आहे. त्यात ४ वर्षांपासून आदिवासी क्षेत्रात 'घरवापसी'चे (धर्मांतरितांना मूळ हिंदु धर्मात परत घेणे) कार्य करत आहे. गोरक्षण हे माझे मुख्य कार्य आहे.
महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात गायींची तस्करी केली जात होती. नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांतून गायींनी भरलेली वाहने बाहेर जात असत. यासमवेतच नाशिक, डांग आणि तापी जिल्ह्यांमध्ये ख्रिस्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर आदिवासींचे धर्मांतर होत होते. ते हिंदुविरोधी बनल्याने गायींचे रक्षण न करता त्यांना पशूवधगृहामध्ये पाठवण्याचे समर्थन करत असत. हे थांबवण्यासाठी आम्ही आदिवासी क्षेत्रात जागृती मोहीम चालू केली. प्रारंभीच्या १ वर्षाच्या काळात डांग आणि तापी या जिल्ह्यांतील गावागावात जाऊन आम्ही लोकांना जागृत केले.
बाहेरून ख्रिस्ती लोक येऊन ते आदिवासींचे धर्मांतर करतात. यात आदिवासींची नाही, तर आपली चूक आहे. आपले साधू-संत आणि समाजातील व्यक्ती यांनी आदिवासी भागात जायला हवे. ख्रिस्ती पाद्री गरीब आणि आदिवासी यांच्या घरी जातात, लहान मुलांसमवेत बसून त्यांचे उष्टे खातात, त्यांना जवळ घेतात, तसेच त्यांना बिस्किटे आणि कपडे देतात. अशा प्रकारे ते आदिवासींची मने जिंकून घेतात. ते लोकांना त्यांच्या मुलांना शाळेत पाठवण्यास सांगतात आणि ती शाळेत गेल्यानंतर आई-वडिलांना चर्चमध्ये येण्यास सांगतात. अशा प्रकारे २-३ आठवडे गेल्यावर ते आदिवासी कुटुंबांना ख्रिस्ती पंथ स्वीकारण्यास सांगतात. हे षड्यंत्र सर्व आदिवासी क्षेत्रात चालू आहे, जे कुणीही समजू शकलेले नाही.
गुजरात येथील श्री. महेंद्र राजपुरोहित 'अग्नीवीर हिंदु संघटने'चे राष्ट्रीय संघटनमंत्री आहेत. त्यांच्या संघटनेद्वारे धर्मांतरितांना परत हिंदु धर्मात घेतले जाते, हिंदूंचे शुद्धीकरण केले जाते आणि त्यांना वैदिक शिक्षण दिले जाते. त्यांच्या संघटनेने आतापर्यंत २ सहस्रांहून अधिक कुटुंबांची शुद्धी केली आहे. यासमवेतच 'बेटी रक्षा' अभियानाच्या अंतर्गत अनेक हिंदु मुलींचे 'लव्ह जिहाद'पासून रक्षणही केले जाते. जातीय एकता, जाती यज्ञ, जानव्यांचे वितरण, शिक्षण, रोजगार यांसारख्या प्रकल्पाद्वारे शेकडो कुटुंबांना त्यांच्याकडून रोजगार दिला जातो. त्यांच्या संघटनेकडून उत्तरप्रदेश आणि राजस्थान येथे २ सहस्र मुलांना नि:शुल्क शिक्षण दिले जाते. पाकिस्तान येथून परत आलेल्या १०० हून आधिक कुटुंबांना घर बांधून देण्यासाठी यांनी साहाय्य केले. मागील १० वर्षांपासून अग्नीवीर संघटनेकडून १ लक्षांहून अधिक गोवंशाचे रक्षण केले आहे.
अ. भजन-कीर्तन आणि वैदिक यज्ञ यांचे आयोजन : हे कार्य चालू केल्यानंतर एक वर्षानंतर आम्ही डांग क्षेत्रात भजन-कीर्तन आणि वैदिक यज्ञ चालू केले. अदिवासींनी प्रथमच श्री हनुमानाचे पदक बघितले. यज्ञाचे हवन करण्यासाठी त्यांना बसायला सांगितल्यावर ते रडायला लागले. 'आम्ही असे कधीही पाहिलेले नाही', असे ते म्हणाले. त्यानंतर आम्ही त्या लोकांच्या कुटुंबियांना भेटलो. त्यांना 'घरवापसी' करा, असे स्पष्टपणे सांगू शकत नव्हतो; कारण त्याने वाद झाले असते.
आ. १०८ आदिवासी मुलींचे सामूहिक विवाह : सर्वप्रथम आम्ही १०८ मुलींचे सामूहिक विवाह लावून दिले. ही आमची पहिली मोहीम होती. त्यात आम्हाला यश मिळाले. त्यानंतर तरुणांना सामावून घेण्यासाठी आम्ही खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या. आम्ही त्यांना 'वन्दे मातरम्' म्हटले पाहिजे आणि भगवा झेंडा लावला पाहिजे, असे सांगितले. प्रारंभी त्याला विरोध झाला; परंतु हे अग्नीवीर आता थांबणार नाहीत, त्यांच्या योजनानुसार ते काम करणारच, हे सर्वांच्या लक्षात आले.
इ. महिलांच्या रोजगारासाठी प्रयत्न : आदिवासी महिलांच्या रोजगार व्यवस्थेसाठी प्रयत्न चालू केले. डांग क्षेत्रात 'नागलिक' नावाचे एक धान्य पिकते. महिलांना त्यापासून पापड बनवण्यास सांगितले. त्यांचे पापड खरेदी करण्याची सिद्धता दाखवली. सुरत येथे साडीवर चकचकीत खडे लावले जातात. आम्ही सुरतच्या व्यापार्यांशी संपर्क साधला आणि त्यांना शहरापेक्षा न्यून किंमतीत साडीवर खडे लावून देण्याची सिद्धता दाखवली. हे काम डांग क्षेत्रातील आदिवासी महिलांना दिले. यासमवेतच त्यांना ऋतूनुसार लोणची बनवायला सांगितली. अशा प्रकारे डांग क्षेत्रातील कालिबिल नावाच्या गावात प्रथमच १०८ कुटुंबियांना परत हिंदु धर्मात आणण्याचे नियोजन केले.
१०८ आदिवासी धर्मांतरितांना परत हिंदु धर्मांत आणण्यासाठी सर्व कागदपत्रे सिद्ध ठेवली. त्या ठिकाणी 'शुद्धीकरण यज्ञ' असा फलक लागला. कुठेही 'घरवापसी'चा उल्लेख नव्हता. या यज्ञाविषयी एका ख्रिस्त्याने जिल्हाधिकारी आणि पोलीस यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार सर्व लोक आले आणि त्यांनी मला याविषयी विचारले. मी म्हटले, 'आमच्या सनातन धर्मात कुणी मांस भक्षण करत असेल किंवा मद्यपान करत असेल, तर त्याच्या शरिराची शुद्धी करण्यासाठी यज्ञ केला जातो. हे त्याचेच आयोजन आहे.' त्यावर ते म्हणाले, 'तुम्ही लोकांची 'घरवापसी' करत आहात.' त्यावर मी त्यांना माझ्याकडील १०८ लोकांची कागदपत्रे असल्याचे सांगितले. त्यातील एक जणही ख्रिस्ती असेल, तर तुम्ही मला शिक्षा करू शकता, असे सांगितले. धर्मांतर करण्यासाठी जिल्हाधिकार्यांची अनुमती घ्यावी लागते, हे मला ठाऊक होते. सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यावर ते तक्रार करणार्याला म्हणाले, 'हे धर्मांतर नाही; कारण हे सर्व आधी हिंदूच होते.'
आदिवासी भागात फार मोठे षड्यंत्र चालू आहे. कागदपत्रांनुसार सर्वजण हिंदु आहेत. सरकारी नोकरी मिळाली, तर ते आदिवासी असतात आणि धर्माची गोष्ट आली, तर ते ख्रिस्ती असतात. त्या ठिकाणी कोणतीही हिंदुत्वनिष्ठ संघटना कार्यरत नाही. वास्तविक ते सर्वाधिक कट्टर हिंदु आहेत. त्यांच्या घरासमोर तुळशीचे रोप असते, त्यांच्या घरात एक गाय असते, घरातून बाहेर पडतांना त्यांच्या गळ्यात भगवे कापड असते, तसेच ते आपल्याला भेटतात, तेव्हा 'राम राम' म्हणतात.
इतके कट्टर हिंदु असतांना आदिवासी धर्मांतर करतात, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण त्यांना साहाय्य करत नसल्याने ते आपल्यापासून लांब जात आहेत. हे मी केवळ डांग क्षेत्राविषयी म्हणत आहे. कागदपत्रे असल्याने आम्ही ९ सहस्र कुटुंबांचे प्रसार माध्यमांसमोर घरवापसी केली. कुंभकर्णाप्रमाणे झोपलेल्या समाजाला जागृत करण्यासाठी धर्मांतरासारख्या गोष्टी सामाजिक माध्यमांवर दाखवल्या जाणे आवश्यक आहे.
एकदा आम्ही ३०० कुटुंबांची एकदम घरवापसी केली. त्यासाठी सामाजिक माध्यमांनाही आमंत्रित केले. सर्वांना घरावर लावण्यासाठी भगवे झेंडे दिले. या ठिकाणी प्रत्येक शनिवारी भजन-कीर्तन चालते. त्या दिवशी आम्ही भंडार्याचीही व्यवस्था करतो. तापी क्षेत्रात ७५ टक्के ख्रिस्ती आहेत. त्या ठिकाणी भगवा झेंडा लावणे, म्हणजे साक्षात् मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे.
मालेगाव हा एक लहान पाकिस्तानच आहे. तेथे आम्ही एका वर्षात गोतस्करांची १५० वाहने पकडली. गोतस्करांशी लढण्यासाठी अग्नीविरांना आवश्यक साहित्य दिले. एक गाडी पकडली, तर ५ सहस्र रुपये बक्षिस म्हणून दिले जाते. त्यामुळे आमच्या अग्नीविरांविषयी गोतस्करांमध्ये भिती निर्माण झाली आहे.
सध्या आम्ही गुजरातच्या आदिवासी क्षेत्रात कार्य करत आहोत. मी उघडपणे गोरक्षणाचे कार्य करतो. त्यामुळे कारागृह हे माझे घरच झाले आहे. वर्षातून २-३ वेळा मी कारागृहात जातो. २५० पशूतस्करांवर खटले चालू आहेत. एका वेळी मला ३-३ न्यायालयात उपस्थित रहावे लागते. हा माझा धर्म आहे. हे कार्य करण्यासाठी ईश्वराने मला निमित्त केले आहे. छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी, महाराणा प्रताप हे माझे आदर्श आहेत. माझ्या पूर्वजांनी मला हिंदु म्हणून जन्माला घातले. कपाळावर लावलेला टिळा ही माझ्या पूर्वजांच्या बलीदानाची आठवण आहे. माझ्या जीवात जीव असेपर्यंत त्याला मी अपमानित होऊ देणार नाही. आपल्या पूर्वजांनी मुसलमानांचे अत्याचार, ब्रिटिशांचे राज्य सहन केले आणि तरीही आमचे पूर्वज 'हिंदु' बनून राहिले आणि आम्हालाही त्यांनी 'हिंदु' म्हणूनच जन्माला घातले आहे. त्यामुळे मी माझ्या हिंदु बांधवांना धर्मांतरित होऊ देणार नाही.
तरुणांना माझे सांगणे आहे की, जर आपण सनातन धर्म मानत असाल, तर आपला 'मृत्यू ठरलेला आहे' हे सत्य आहे. ज्या दिवशी आपला जन्म होतो, तेव्हाच आपल्या मृत्यूची वेळ आणि जागा ठरलेली असते, मग आपण का घाबरायचे ? घाबरल्याने आपण प्रतिदिन थोडे थोडे मरत असतो. त्याहून देश आणि धर्म यांसाठी एकदाच मरा ! गीतेत म्हटले आहे, 'धर्मासाठी जो मरण पत्करतो त्याला मोक्षप्राप्ती होते.' आपल्याला मोक्ष मिळवायचा असेल, तर धर्मासाठी बलीदान केले पाहिजे.'
- श्री. महेंद्र राजपुरोहित, राष्ट्रीय संघटनमंत्री, अग्नीवीर हिंदु संघटना.

