मुंबई - यंदा जांभळाचे उत्पादन कमालीचे घटले आहे; मात्र असे असले, तरीही बाजारात जांभळांचे दर प्रति किलो ३०० ते ४०० रुपयांपर्यंत आहेत. हवामान तज्ञांच्या मते ऐन मोहराच्या (फुलोर्याच्या) काळात झालेल्या अवकाळी पावसामुळे जांभळाचे फूल गळून पडले.
तापमानात अचानक झालेल्या पालटांमुळे फळधारणा योग्य प्रकारे झाली नाही. याखेरीज भूजल पातळीत झालेली घट आणि उष्णतेच्या लाटांमुळे फळांचा आकार अन् दर्जा यांवर विपरीत परिणाम झाला आहे.
अलीबाग - येथे समुद्रकिनार्यावर समुद्रातून वाहून आलेले लहान लहान डांबराचे गोळे (टार बॉल्स) मोठ्या प्रमाणात किनार्यावर साचत आहेत. यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. किनार्यावर ठिकठिकाणी दिसणारे काळे डाग सागरी प्रदूषणाचे संकेत देत आहेत. हे टार बॉल्स भरतीसमवेत वाहून येत वाळूत पसरत आहेत. काही ठिकाणी त्यांचे थरही साचलेले आहेत. हे टार बॉल्स तेलगळती, जहाजांमधून सोडलेले इंधन, कचरा, तसेच औद्योगिक सांडपाणी यांमुळे तयार होतात. समुद्रातील तेल लाटांमुळे घट्ट होऊन लहान गोळ्यांमध्ये रूपांतरित होते. भरती-ओहोटीच्या प्रक्रियेमुळे हे गोळे किनार्यावर येऊन साचतात.
संपादकीय भूमिका : समुद्रातील प्रदूषणाचा परिणाम !
मुंबई - राज्यात उष्म्याचा तडाखा वाढता आहे. १ मार्च ते ३ मे या कालावधीत राज्यात उष्माघाताचा त्रास झालेल्या १६३ रुग्णांची नोंद झाली आहे, तर ३ जणांचा मृत्यू हा उष्माघातामुळे झाल्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर येथे ४६ जणांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. नंदुरबार येथे २२, नाशिकमध्ये १४, अमरावतीमध्ये १० आणि बुलढाणा येथे ११ जणांना उष्माघाताचा त्रास झाला.
मुंबई - मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर ५ मे या दिवशी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास पवना चौक येथील पुलावर वेगाने धावणार्या चारचाकीने लोखंडी कठड्याला जोरदार धडक दिल्यानंतर काही क्षणांतच संपूर्ण चारचाकीला आग लागली. या आगीत चालकाचा गाडीमध्येच होरपळून मृत्यू झाला. या वेळी स्फोटासारखा मोठा आवाज झाला. रस्त्यावरील नागरिकांनी चालकाला बाहेर काढायचा प्रयत्न केला; परंतु आग अधिक असल्यामुळे साहाय्य करणे शक्य झाले नाही.
मुंबई - ज्या ठिकाणी नाले स्वच्छतेची कामे चालू आहेत, त्या ठिकाणी सीसीटीव्ही छायाचित्र बसवावेत. तसेच लोकप्रतिनिधींना नाले स्वच्छतेच्या कामांचे प्रत्यक्ष निरीक्षण करता यावे आणि प्रगतीची माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी आवश्यक सुविधा द्याव्यात. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील नाले स्वच्छता मोहीम परिणामकारक व्हावी, यासाठी काटेकोर नियोजन आणि कार्यवाही यावर विशेष भर द्यावा, असे विविध निर्देश महापौर सौ. रितू तावडे यांनी दिले, तसेच आवश्यक त्या ठिकाणी रोबोटिक यंत्रणेचा वापर करावा, असेही निर्देश दिले आहेत.

