Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आपत्काळाची कारणे आणि त्यापासून वाचण्याचे उपाय (साधना) !

आपत्काळाची कारणे आणि त्यापासून वाचण्याचे उपाय (साधना) !

पत्काळाचे मूळ कारण अधर्माचरण आहे. पुराणांत 'अधर्माचरण करणे, कुलाचार न पाळणे, साधना न करणे आदी कारणांनी देवतांपर्यंत आवश्यक पूजा, विधी आणि नैवेद्य पोचत नाही. त्यामुळे देव पृथ्वीवर संकटे पाठवतात', असे म्हटले आहे.

सध्याच्या कलियुगात अनेक लोकांकडून असे अपराध घडत आहेत. आपत्काळात उद्भवणारी संकटे संपूर्ण समाजाला भोगावी लागतात. त्यामुळे अशा संकटांना 'समष्टी प्रारब्ध' म्हटले जाते.

या समष्टी संकटांवर मात करण्यासाठी धर्माचरण आणि साधना करणे अत्यावश्यक आहे. आपत्काळाचा समर्थपणे सामना करण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर सिद्धता केली पाहिजे. आपत्काळात उपासमार होऊ नये; म्हणून शक्य तितक्या जीवनावश्यक वस्तूंचा साठा केला किंवा विकार निर्मूलनासाठी अनेक उपचार शिकलो, तरीही सुनामी किंवा भूकंप एका क्षणात सहस्रो नागरिकांना गिळंकृत करू शकतो. या भयावह आपत्तींमधून स्वरक्षण झाल्यासच ही सिद्धता उपयोगी पडेल. जीवघेण्या संकटातून केवळ देवच वाचवू शकतो. 'आपल्याला त्याने वाचवावे', असे वाटत असेल, तर तो प्रसन्न झाला पाहिजे. त्यासाठी आपण काळानुसार साधना केली पाहिजे. आध्यात्मिक स्तरावरील हीच सिद्धता आहे. थोडक्यात शारीरिक आणि मानसिक स्तरांवरील सिद्धतेसह धर्माचरण अन् आध्यात्मिक साधना करणे आवश्यक आहे.

देवाची कृपा संपादन करणे आणि स्वतःच्या घराचे रक्षण होणे यांसाठी प्रतिदिन आध्यात्मिक साधना केली पाहिजे. त्यामुळे आपल्यातील सात्त्विकता वाढते. आपल्या मनात भक्तीचे केंद्र निर्माण होते. आपल्याला देवाचा आशीर्वाद मिळतो आणि घरात सात्त्विक अन् आनंदी वातावरण निर्माण होते. जे प्रतिदिन भक्तीभावाने देवाची उपासना करतात, ते देवाचे प्रिय होतात. देवाचे प्रिय झाल्याने देव संकटाच्या काळात साधक आणि साधनेच्या सात्त्विक स्पंदनांनी बनलेले त्याचे घर यांचे रक्षण करतो.

अ. आपल्या घराभोवती देवतांच्या सात्त्विक लहरींचे संरक्षककवच निर्माण करण्यासाठी सकाळ-संध्याकाळ देवघरात आणि तुळशीजवळ दिवा लावावा अन् देवता, तसेच तुळस यांना नमस्कार करावा. यासह घरात देवतांच्या नामपट्ट्यांचे मंडल करून सात्त्विकता निर्माण करता येईल.

आ. सकाळी सूर्योदयापूर्वीचा आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतरचा ४८ मिनिटांचा (दोन घटिका) कालावधी 'संधीकाळ' म्हणून ओळखला जातो. संधीकाळ हा अनिष्ट शक्तींच्या आगमनाचा काळ असतो. त्यामुळे त्यांच्यापासून स्वतःचे रक्षण होण्यासाठी या वेळी देवघर आणि अंगणात तुळशीजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावावा.

इ. संभाव्य तिसर्‍या महायुद्धात अणूबाँबचा वापर होण्याची शक्यता पहाता प्रतिदिन अग्निहोत्र करावे.

ई. तिळाचे तेल अन्य तेलांहून अधिक सात्त्विक असते. गुरुचरित्रात वर्णन केल्याप्रमाणे यज्ञात हवन करण्यासाठी तूप उपलब्ध नसल्यास आवश्यकतेनुसार तिळाचे तेल वापरता येते. त्यामुळे तिळाच्या तेलाचा दिवा लावणे उचित आहे. तिळाच्या तेलाचा दिवा लावणे शक्य नसल्यास गोडेतेलाचा (शेंगदाणा तेलाचा) दिवा लावावा.

उ. देवघर आणि तुळशी वृंदावन यांच्याजवळ दिवा लावून देव, तुळस अन् दिवा यांना नमस्कार केल्याने घराभोवती देवतांच्या सात्त्विक लहरींचे संरक्षककवच निर्माण होते. त्यामुळे घरातील लोकांचे अनिष्ट शक्तींपासून रक्षण होते. देवतांच्या कृपेच्या कवचामुळे अन्य संकटांपासूनही घराचे रक्षण होण्यास साहाय्य मिळते.

आपत्काळात उद्भवू शकणार्‍या भयावह आपत्ती टाळण्यासाठी चांगली साधना करणे आणि देवाचे भक्त होणे आवश्यक आहे. देवाने त्याच्या भक्तांचे रक्षण केल्याची असंख्य उदाहरणे आहेत. भक्तीचा महिमा अथांग आहे. भगवान श्रीकृष्णाने गीतेत त्याच्या भक्तांना, 'न मे भक्तः प्रणश्यति ।' (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय, श्लोक ३१ - अर्थ : माझ्या भक्ताचा नाश होणार नाही), असे वचन दिले आहे. या वचनानुसार कितीही मोठे संकट आले, तरी देवाने त्याच्या भक्तांचे रक्षण केले आहे. यासंदर्भात आपल्या पुराणांमध्ये भक्त प्रल्हाद, महापराक्रमी पांडव, पतीव्रता द्रौपदी यांसारखी असंख्य उदाहरणे आहेत. जर आपणही भक्ती केली, तर देव आपलेही निश्चितच रक्षण करील.

- सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

चांगले आरोग्य आणि संरक्षककवच मिळावे, यासाठी आपण श्लोक अन् स्तोत्रे म्हणू शकतो. संध्याकाळी दिवा लावल्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून पुढील श्लोक आणि स्तोत्रे म्हणावीत. जेव्हा आपण अर्थ समजून घेऊन श्लोकाचे पठण करतो, तेव्हा शब्दांशी आपला भावही जोडला जातो. भाव जागृत झाल्याने आपण ईश्वराच्या अस्तित्वाचा अनुभव घेऊ शकतो.

३ अ. दिवा लावतांना म्हणावयाचे श्लोक :

३ अ १.

शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा ।
शत्रुबुद्धिविनाशाय दीपकाय नमोऽस्तुते ॥

अर्थ : दीपज्योति शुभ आणि कल्याण करते, त्याचप्रमाणे आरोग्य अन् संपत्ती देते, तसेच स्वतःच्या मनातील शत्रूबुद्धीचा म्हणजे द्वेषाचा नाश करते; म्हणून हे दीपज्योती, तुला नमस्कार असो !

३ अ २.

दीपज्योतिः परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः ।
दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोऽस्तुते ॥

अर्थ : दिव्याचा प्रकाश परब्रह्मस्वरूप आहे. दीपज्योति जगाची दुःखे दूर करणारी देवता आहे. हे दीप, माझे पाप दूर कर. दीपज्योति, मी तुला वंदन करतो !

३ आ. स्तोत्राचे महत्त्व : कोणतेही स्तोत्र म्हणतांना त्यात दिलेली फलश्रुती आपण ऐकली असेल. स्तोत्राच्या फलश्रुतीमध्ये म्हटले आहे, 'देवतेचे स्तोत्र म्हटल्याने संकटांपासून रक्षण होते.' स्तोत्र म्हटल्याने निर्माण होणार्‍या सात्त्विक स्पंदनांमुळे घराची आध्यात्मिक शुद्धी होते. त्यासाठी प्रतिदिन श्रीरामरक्षास्तोत्र, हनुमानचालिसा, देवीकवच यांसारख्या आपापल्या उपास्यदेवतांची स्तोत्रे श्रद्धेने आणि भक्तीभावाने म्हणावीत.

श्लोक आणि स्तोत्रे यांच्या समवेतच अग्निहोत्रही तेवढेच महत्त्वाचे आहे. जागतिक युद्धांत अणूबाँबचा वापर होऊ शकतो. त्यातून निघणार्‍या किरणोत्सर्गाच्या प्राणघातक परिणामांपासून स्वतःसह कुटुंबियांचे रक्षण होण्यासाठी प्रतिदिन अग्निहोत्र करणे आवश्यक असते. अणूबाँबमधून निघणार्‍या विषारी किरणोत्सर्गावर आधुनिक विज्ञानाकडे उपाय नाही. वातावरणातील किरणोत्सर्ग प्रदूषण नाहीसे करण्यासाठी अग्निहोत्र करणे, हा प्रभावी आध्यात्मिक उपाय आहे. हा सोपा आणि अल्प कालावधीत होणारा प्रभावी यज्ञ आहे. या यज्ञामुळे वातावरण चैतन्यमय होते. यज्ञ करणार्‍याभोवती संरक्षककवच निर्माण होते.

- सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi