(टीप : कवल-गंडूष ही मुखशुद्धीसाठी आयुर्वेदाची एक वैशिष्ट्यपूर्ण पद्धत आहे.)
आपल्या दैनंदिन जीवनात तोंडाची स्वच्छता, म्हणजेच मुखशुद्धी (Oral Hygiene - ओरल हायजीन) ही एक अत्यंत सामान्य गोष्ट वाटू शकते; परंतु सहस्रो वर्षांपूर्वीच आयुर्वेदाने मुखारोग्याला केवळ दात स्वच्छ करण्याची क्रिया न मानता; दात, हिरड्या, जीभ, तोंडवळा आणि संपूर्ण मुखाचे आरोग्य राखणार्या एका सर्वसमावेशक दिनचर्येचा भाग म्हणून स्पष्ट केले आहे.
ब्राह्म मुहूर्तावर उठून दैनंदिन शौचादी विधी पूर्ण केल्यानंतर केल्या जाणार्या प्रमुख दिनचर्याक्रमांपैकी दंतधावन हा एक महत्त्वाचा भाग आहे.
'दंत' म्हणजे दात आणि 'धावन' म्हणजे शुद्धीकरण / स्वच्छता; म्हणजेच दात आणि तोंडाचा आतील भाग स्वच्छ करण्याच्या पद्धतीला 'दंतधावन' म्हणतात.
आयुर्वेदात यासाठी केवळ 'टूथब्रश' हे साधन सांगितले नसून विशिष्ट औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींच्या काड्या (दंतकाष्ठ किंवा दंतपवन) वापरण्याची पद्धत वर्णन केली आहे.
आचार्य सुश्रुत आणि वाग्भट यांनी दंतकाष्ठाचे स्वरूप अतिशय स्पष्टपणे मांडले आहे. ते साधारणपणे १२ अंगुळे लांब असावे. त्याची जाडी कनिष्ठिका बोटाएवढी (करंगळीएवढी) असावी. ते सरळ असावे. त्यावर अनावश्यक गाठी नसाव्यात. ते ताजे असावे. पुढचे टोक मऊ (ठेचून) करून वापरावे. दात स्वच्छ करतांना हिरड्यांना इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी.
थोडक्यात आयुर्वेदातील दंतकाष्ठ ही केवळ लाकडाची काडी नसून तिची लांबी, जाडी, ताजेपणा, मऊपणा आणि औषधी गुणधर्म या सर्वांचा बारकाईने विचार केला गेला आहे.
दंतधावनासाठी वापरले जाणारे द्रव्य त्याच्या रस (चव), गुण, वीर्य, दोषांची स्थिती आणि ऋतू या घटकांचा विचार करून निवडले जाते. मुख्यत्वे कटू (तिखट), तिक्त (कडू) आणि कषाय (तुरट) रसयुक्त द्रव्यांना दंतधावनासाठी प्राधान्य दिले आहे. सुश्रुत परंपरेत मधुर (गोड) रसाचाही उल्लेख आढळतो.
यासाठीची प्रमुख उदाहरणे -
अ. निंब (कडुनिंब - Azadirachta indica) : तिक्त रसासाठी प्रसिद्ध.
आ. खदिर (खैर - Acacia catechu) : कषाय रसासाठी प्रसिद्ध.
इ. करंज (Pongamia pinnata) : कटू रसासाठी प्रसिद्ध.
ई. मधुक (महुआ - Madhuca spp.) : मधुर रसासाठी प्रसिद्ध.
याखेरीज अर्क (रुई), न्यग्रोध (वड), ककुभ (अर्जुन) इत्यादी वनस्पतींचाही ग्रंथांमध्ये उल्लेख आहे.
हा आयुर्वेदाचा अत्यंत शास्त्रोक्त औषधीय (pharmacological) दृष्टीकोन आहे.
अ. कटू रस : कफहारक, मुखशोधक आणि कफ-क्लेद दूर करण्यास साहाय्य करतो.
आ. तिक्त रस : कृमीनाशक (जंतूनाशक), लेखन (अतिरिक्त चरबी / कफ अल्प करणारे) आणि लाळदोष न्यून करतो.
इ. कषाय रस : संकोचक (संगाही), शोधक आणि व्रणरोपक (जखमा भरून काढणारा) असून हिरड्या मजबूत ठेवतो.
सर्वच परिस्थितीत दंतकाष्ठ मिळणे किंवा वापरणे शक्य नसते. अशा वेळी आयुर्वेदात दंतशोधन चूर्णाचा उल्लेख मिळतो. सुश्रुत परंपरेत मध, त्रिकटू, त्रिवर्ग, तेजोवती, सैंधव मीठ आणि तेल यांचा समावेश असलेले दंतशोधन योग सांगितले आहेत. याचा उद्देश 'केवळ दात घासणे हा नसून मुखशुद्धी, दुर्गंधी नाहीशी करणे, चव वाढवणे आणि कफ दूर करणे', हा आहे.
नाही. येथे आयुर्वेदाचे आणखी एक मूलभूत तत्त्व स्पष्ट होते, 'एखादी गोष्ट निरोगी व्यक्तीसाठी उपयुक्त असली, तरी विशिष्ट आजारांमध्ये ती टाळली पाहिजे.'
६ अ. दंतधावन वर्ज्य असणार्या अवस्था : अपचन (अजीर्ण), उलटी (वमन), श्वासविकार (दमा) आणि खोकला, ताप (ज्वर), अर्दित (फेशिअल पाल्सी / चेहर्याचा पक्षाघात), अतिशय तहान लागणे (तृष्णा), मुखपाक (तोंड येणे / अल्सर); जीभ, ओठ किंवा टाळूचे आजार; डोळ्यांचे, डोक्याचे किंवा कानांचे तीव्र विकार, दातांच्या आणि चेहर्याच्या तीव्र वेदना, अतीथकवा, अशा स्थितीत ब्रशने जोरात घासण्याऐवजी वैद्यांच्या सल्ल्यानुसार मऊ दंतशोधनपद्धत किंवा कवल-गंडूषासारखे उपचार केले जातात.
आयुर्वेदाची मुखआरोग्य संकल्पना केवळ दात घासण्यापुरती मर्यादित नाही.
दंतधावन → जिव्हा निर्लेखन → मुखप्रक्षालन → कवल/गंडूष, अशा समग्र क्रमाने मुखस्वच्छता सांगितली आहे.
अ. जिव्हा निर्लेखन (जीभ साफ करणे) : जिभेवर जमा झालेला पांढरा थर योग्य साधनाने हळूवार साफ करणे. यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होऊन चव समजण्याची क्षमता वाढते.
आ. कवल आणि गंडूष : ही आयुर्वेदाची एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पद्धत आहे.
आ १. गंडूष : तोंडात औषधी द्रव किंवा तेल पूर्ण भरून ते न हालवता काही वेळ धरून ठेवणे.
आ २. कवल : तोंडात थोडे द्रव/तेल घेऊन ते गुळणीसारखे आतल्या आत फिरवणे.
विशेषतः तीळाच्या तेलाने (Oil Pulling) कवल किंवा गंडूष केल्याने दात आणि हिरड्या अतिशय बळकट होतात.
आज बाजारात अनेक प्रकारच्या 'टूथपेस्ट', 'माऊथवॉश' आणि उत्पादने उपलब्ध आहेत; परंतु सहस्रो वर्षांपूर्वी आयुर्वेदाने विचार केला होता, 'केवळ तोंड कसे स्वच्छ करायचे ?' एवढेच नाही, तर 'कोणत्या द्रव्याने ? कोणत्या गुणांनी ? कुणासाठी ? कोणत्या ऋतूत ? आणि कसे ?' म्हणूनच आयुर्वेदात मुखाचे आरोग्य (ओरल हायजीन) ही केवळ एक सौंदर्यवर्धक (कॉस्मेटिक) सवय नसून आरोग्याचे रक्षण करणार्या दिनचर्येचा महत्त्वाचा भाग आहे.
आपल्या पूर्वजांनी मुखआरोग्याला दंतधावनापासून ते जिव्हा निर्लेखन, मुखप्रक्षालन, कवल आणि गंडूष इथपर्यंत एक परिपूर्ण शास्त्रीय स्वरूप दिले. 'मुख स्वच्छ रहावे. चव, दात, हिरड्या आणि संपूर्ण मुख यांचे स्वास्थ्य टिकून रहावे', हाच खरा उद्देश आहे. आरोग्य हीच खरी संपत्ती असून दिनचर्येतील लहान-लहान चांगल्या सवयीच दीर्घायुष्याचा खरा पाया आहेत.
- वैद्या (कु.) नित्यश्री वाय्., श्री शारदा आयुर्वेदालय, होळेहोन्नूरु, जिल्हा शिवमोग्गा, कर्नाटक.

