मुंबई - अन्न आणि औषध विभागाचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच अवघ्या २ दिवसांत ४० ठिकाणी धाडी घालून गुटखा आणि पानमसाला माफिया प्रकरणातील ३२ आरोपींना अटक केली.
या धडक कारवाईत २४ गुन्हे नोंद करण्यात आले असून १२ लाख १६ सहस्र रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव आणि खेड तालुक्यांत १९ लाख रुपयांहून अधिक किमतीचा अन्नाचा संशयास्पद साठा जप्त करण्यात आला. 'नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्या कुणाचीही गय केली जाणार नाही', अशी चेतावणी आयुक्त मुंढे यांनी दिली आहे.
पैशांच्या हव्यासापोटी खोटी आणि दिशाभूल करणारी विज्ञापने प्रसारित करणार्या आस्थापनांसह विज्ञापनांमध्ये सहभागी होणार्या कलाकारांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्त मुंढे यांनी स्पष्ट केले. (केवळ पैशांसाठी समाजाला चुकीच्या मार्गावर नेणार्यांवर वचक बसवण्यासाठी असे पाऊल उचलणे स्तुत्यच ! - संपादक) ग्राहक संरक्षणासाठी प्रशासनाने घेतलेल्या या कठोर भूमिकेचे सर्वसामान्य जनतेकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.

