अयोध्या (उत्तरप्रदेश) - येथील दर्शननगरमध्ये असणार्या राजर्षि दशरथ मेडिकल कॉलेजमध्ये एका विद्यार्थ्याकडे बाँब बनवण्याशी संबंधित माहिती असलेली चिठ्ठी आढळली. पोलिसांनी अन्वेषण चालू केले असून ही चिठ्ठी त्याच्याकडे कशी पोचली आणि त्यामागील उद्देश काय होता, याचा शोध घेण्यासाठी विद्यार्थ्याची सतत चौकशी केली जात आहे.
चिठ्ठी मिळालेला विद्यार्थी पॅरामेडिकलच्या (रोगनिदान, डॉक्टरांना उपचारात साहाय्य आदी प्रशिक्षण देणारा अभ्यासक्रम) प्रथम वर्षात शिकत असून तो मूळचा बलरामपूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. त्याने याच वर्षी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आहे. १ ऑगस्टला त्याची सेवा कॉलेजच्या प्रयोगशाळेत होती. या वेळी त्याच्याकडे एक चिठ्ठी आढळली. त्यामध्ये स्फोटक साहित्य आणि बाँबच्या रचनेशी संबंधित माहिती लिहिलेली होती. चिठ्ठी सापडल्याची माहिती मिळताच मेडिकल कॉलेज प्रशासनाने तातडीने पोलिसांना कळवले. यानंतर पोलीस पथक घटनास्थळी पोचले आणि त्यांनी विद्यार्थ्याला कह्यात घेऊन चौकशी चालू केली.

