पणजी, १ सप्टेंबर (वार्ता.) - गोवा सरकारने धर्मांतरविरोधी विधेयक विधानसभेत न मांडता मागे घेण्याची घटना ताजी असतांनाच 'द व्हॉइस् ऑफ गोवा' या स्थानिक वृत्तवाहिनीने तिसवाडी तालुक्यात ताळगाव येथे 'बिलिव्हर्स' करत असलेले धर्मांतराचे प्रकार उघडकीस आणले आहेत.
या वृत्तवाहिनीत दिलेल्या वृत्तानुसार 'बिलिव्हर्स'कडून शिवोलीनंतर आता तिसवाडी तालुक्यातही बिलिव्हर्स पंथाचा प्रचार केला जात आहे. तिसवाडी तालुक्यात ताळगाव येथील शेतात रस्त्यापासून काही मीटर अंतरावर एक पक्के बांधकाम करण्यात आले आहे आणि या ठिकाणी 'बिलिव्हर्स'चे प्रार्थनास्थळ चालू आहे. या ठिकाणी रविवारी प्रार्थना होतात आणि या प्रार्थनेला नेपाळी लोक मोठ्या प्रमाणात येत असल्याने या प्रार्थनास्थळाला 'नेपाळी चर्च', असे संबोधले जाते. या ठिकाणी रविवारी सकाळी देशभरातील परप्रांतीय, तर दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत केवळ नेपाळी लोक येतात.
या ठिकाणी धर्मांतर केले जाते. या ठिकाणी देहली येथील पास्टर आहेत. गोव्यात गेल्या काही दिवसांत 'गुरखा' आडनाव असलेल्या व्यक्तीने 'डिसोझा' आडनाव धारण करण्यासाठी शासनाकडे अर्ज केला आहे आणि यासंबंधीचे वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले विज्ञापन सामाजिक माध्यमात मोठ्या प्रमाणात पसरले होते. आडनाव पालटण्याची म्हणजेच धर्म पालटण्याची ही घटना आणि ताळगाव येथील 'नेपाळी चर्च' कार्यरत असणे यांमुळे गोव्यात धर्मांतराच्या चालू असलेल्या घटना पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाला आहे.

