वास्को - दाबोलीजवळ २ मे या दिवशी सायंकाळी वाहनाची ठोकर बसून झालेल्या अपघातात ५६ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून वेगाने पळून गेला. हा अपघात होण्यापूर्वी संबंधित वाहन आमदार संकल्प आमोणकर यांच्या वाहनाला सुसाट वेगात ओलांडून पुढे गेले होते.
अपघात झाल्याचे निदर्शनास आल्यावर आमदार संकल्प आमोणकर यांनी वेळ न दवडता संबंधित वाहनाचा अनुमाने १२ कि.मी. थरारक पाठलाग केला. त्याच वेळी आमदार संकल्प आमोणकर यांनी याविषयीची माहिती मुरगाव बंदर, वास्को आणि दाबोली पोलिसांना दिली. संबंधित वाहनचालक गोव्यात नवीन असल्याने त्याने वाहन मुरगाव बंदरावर जाणार्या उड्डाणपुलाचा मार्ग धरला; मात्र रस्ता पुढे बंद असल्याने वाहनचालकाला तेथे वाहन थांबवावे लागले. तेथे आमदार संकल्प आमोणकर आणि पोलीस पोचले असता त्यांनी वाहनचालकाला कह्यात घेतले. सचिन चोप्रा (उज्जैन, मध्यप्रदेश) हे संशयित वाहनचालकाचे नाव आहे, तर सिद्धम मदार (वय ५६ वर्षे) हे मृत महिलेचे नाव आहे.

