देवगड - येथील भूमी अभिलेख कार्यालयात खातेदारांनी मागणी करूनही भूमीचा नकाशा मिळत नाही; मात्र दलालांनी मागणी केल्यानंतर कार्यालयातून तात्काळ नकाशा दिला जातो. कार्यालयात भ्रष्टाचार बोकाळला आहे, असा गंभीर आरोप देवगड पंचायत समितीच्या मासिक सर्वसाधारण सभेत उपसभापती अमोल लोके यांनी केला.
देवगड पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा छत्रपती संभाजी महाराज सभागृहात ४ मे या दिवशी सभापती गणेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी उपसभापती अमोल लोके, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, साहाय्यक गटविकास अधिकारी विनायक पाटील उपस्थित होते.
सभागृहाचे माजी सदस्य अरविद भोगले यांना त्यांचे उत्पन्न अधिक असल्याचे दाखवून घरकूल योजनेतून अपात्र ठरवले गेले, तसेच हिंदळे येथील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणार्या एका ग्रामस्थालाही त्याचे अधिक उत्पन्न असल्याचे दाखवून घरकुल योजनेतून अपात्र ठरवले गेले. चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण करून लाभापासून वंचित ठेवणार्या या संबंधित कर्मचार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सदस्य सदाशिव ओगले यांनी केली.
तांबळडेग दक्षिणवाडा येथील ग्रामस्थांनी पाणी प्रश्नाविषयी १ मे या दिवशी उपोषणाला बसण्याची नोटीस दिली होती; मात्र पाणीपुरवठा अधिकारी आणि संबंधित ग्रामसेवक यांनी 'पाण्याची व्यवस्था करतो', असे आश्वासन दिल्यामुळे ग्रामस्थांनी उपोषण थांबवले होते; मात्र अद्यापही त्या ग्रामस्थांची पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचे ग्रामस्थांनी कळवले असल्याचे सभागृहात सांगण्यात आले. त्या वेळी उपसभापती अमोल लोके यांनी, 'आश्वासन देऊनही पाण्याची व्यवस्था न करणारे सबंधित पाणीपुरवठा अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करावी', अशी सूचना केली.

