पणजी, २३ ऑक्टोबर (वार्ता.) - गोव्यात २३ ऑक्टोबर या दिवशी दुपारी वादळी वारे आणि विजांचा कडकडाट यांसह झालेल्या जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. दुपारी २ वाजल्यापासून राज्यातील तिन्ही जिल्ह्यांतील काही भागांत मुसळधार पाऊस पडला.
अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले, झाडे उन्मळून पडली, तर काही ठिकाणी घरांवर झाडे पडून हानी झाली. या पावसामुळे भातपिकाला फटका बसण्याची शक्यता शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.
सकाळपासून राज्यात उष्ण आणि दमट वातावरण होते; मात्र दुपारनंतर हवामानात अचानक पालट होऊन वादळी वार्यासह पावसाला प्रारंभ झाला. काही भागांत पावसाचा जोर अधिक असल्याने रस्त्यांवर पाणी साचले. झाडांच्या फांद्या तुटून पडण्यासह मोठी झाडेही रस्त्यावर कोसळली आहेत. काही ठिकाणी घरांवर झाडे कोसळली आहेत.
१. राज्य हवामान खात्याने २३ ऑक्टोबर या दिवशी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. अशाच प्रकारे २४ आणि २५ ऑक्टोबर या दिवशी राज्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. वादळी वार्याच्या वेळी झाडांखाली किंवा कमकुवत बांधकाम यांच्याजवळ थांबू नये. रस्त्यांवर पडलेली झाडे आणि विद्युत् तारा यांपासून दूर राहून आवश्यक दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
२. पणजी शहरात सततच्या पावसामुळे मळा, पाटो आणि अन्य परिसर येथील काही रस्त्यांवर पाणी भरले होते. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक संथ गतीने चालू होती. पणजी शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली.
३. २४ घंट्यांमध्ये पणजी येथे कमाल ३६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. २९ ऑक्टोबरपर्यंत राज्यातील कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सियस रहाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

