Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गोव्यात पुढील शैक्षणिक वर्षापासून सुधारित पाठ्यपुस्तके लागू होणार

गोव्यात पुढील शैक्षणिक वर्षापासून सुधारित पाठ्यपुस्तके लागू होणार

पणजी, २ जून (वार्ता.) - गोव्यात 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा'नुसार इयत्ता ८ वीपर्यंत नवीन पाठ्यपुस्तके लागू केल्यानंतर आता 'राष्ट्रीय शैक्षणिक, संशोधन आणि प्रशिक्षण मंडळ (नॅशनल काऊंसिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग) इयत्ता ९ वी ते इयत्ता ११ वीपर्यंत नवीन पाठ्यपुस्तके सिद्ध करत आहे.

ही पाठ्युपस्तके पुढील शैक्षणिक वर्षात (वर्ष २०२७-२८ मध्ये) लागू केली जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती गोवा शालांत मंडळाचे अध्यक्ष भगिरथ शेट्ये यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

ते पुढे म्हणाले, ''ही नवीन पाठ्यपुस्तके इंग्रजी, गणित, भौतिकशास्त्र (फिजिक्स), रसायनशास्त्र (केमिस्ट्री), जीवशास्त्र (बायोलॉजी) आणि हिंदी या विषयांना लागू होणार आहेत, तर इतिहास आणि भूगोल या विषयांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये हल्लीच पालट करण्यात आल्याने ती पाठ्यपुस्तके पूर्वीप्रमाणेच रहाणार आहेत. चालू शैक्षणिक वर्षात (वर्ष २०२६-२७ ला) पूर्वीचीच पाठ्यपुस्तके लागू होणार आहेत. नवीन पाठ्यपुस्तकांमध्ये केवळ भारत आणि जग यांचाच नव्हे, तर गोव्याचाही सर्वांगीण विकास कसा झाला ? याविषयी माहिती असणार आहे. मंडळाने वर्ष २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ९ वीला सुधारित इतिहासाचे पाठ्यपुस्तक लागू केले आहे. या पाठ्यपुस्तकामध्ये गोव्याच्या इतिहासपूर्व, प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाची माहिती आहे. विशेष म्हणजे यामध्ये कुंकळ्ळी येथील पोर्तुगिजांच्या विरोधातील उठावाची माहिती आहे. पाठ्यपुस्तकांमध्ये प्रथमच ही माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. इयत्ता १० वीच्या नवीन पाठ्यपुस्तकामध्ये गोव्यातील आधुनिक राजकीय आणि स्वातंत्र्य लढा, राणे यांचे बंड (वर्ष १८५२ ते १९१२), वर्ष १९२८ पासून उदयास आलेल्या राजकीय संघटना, गोवा क्रांती दिन, 'आझाद गोमंतक दला'चे कार्य, वर्ष १९५४ आणि १९५५ चे सत्याग्रह, 'ऑपरेशन विजय' आणि दयानंद बांदोडकर यांच्या नेतृत्वाखालील गोव्यात स्थापन झालेले पहिले सरकार यांची माहिती आहे. या पाठ्यपुस्तकात टी.बी. कुन्हा, ज्युलिओ मिनेझीस, राम मनोहर लोहिया, पुरुषोत्तम काकोडकर, लिबिया लोबो सरदेसाई आणि कर्नल सिंह यांच्या कार्याची माहिती आहे. नवीन पाठ्यपुस्तकांमध्ये गोव्यात स्वातंत्र्यानंतर प्रशासनात झालेली क्रांती, गोव्याला राज्याचा दर्जा मिळणे, वर्ष २०१६ आणि वर्ष २०१९ मधील 'सर्जिकल स्ट्राईक', वर्ष २०२० मधील गलवान संघर्ष आणि वर्ष २०२५ मधील 'ऑपरेशन सिंदूर', यांची माहिती असणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi