Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गोव्यात यंदा नैऋत्य मौसमी पाऊस (मॉन्सून) नेहमीपेक्षा विलंबाने पोचण्याची शक्यता

गोव्यात यंदा नैऋत्य मौसमी पाऊस (मॉन्सून) नेहमीपेक्षा विलंबाने पोचण्याची शक्यता

पणजी, २ जून (वार्ता.) - यंदा गोव्यात नैऋत्य मौसमी पाऊस नेहमीपेक्षा विलंबाने पोचण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रावरील त्याची प्रगती अपेक्षेपेक्षा मंद असल्याने हा विलंब होऊ शकतो. हवामान तज्ञांच्या मते दक्षिण अरबी समुद्रावरील प्रतिकूल वातावरणामुळे पावसाची वाटचाल संथ झाली आहे.

भारतीय हवामान विभागाने केरळमध्ये ४ जून या दिवशी पावसाचे आगमन होण्याची शक्यता वर्तवली आहे. सामान्यतः पावसाला केरळ येथून गोव्यात पोचण्यासाठी काही दिवस लागतात. त्यामुळे गोव्यातील ५ जून हा पारंपरिक आगमनाचा दिनांक यंदा गाठला जाण्याची शक्यता अल्प आहे. गोव्यात अधूनमधून पावसाळापूर्व सरी कोसळत रहाण्याची शक्यता असून त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळू शकतो. गेल्या दशकातील नोंदींनुसार गोव्यात पावसाचे विलंबाने आगमन होण्याचे प्रमाण वाढले आहे. वर्ष २०१६ आणि २०१९ मध्ये पावसाला लक्षणीय विलंब झाला होता. त्याचप्रमाणे वर्ष २०२२ मध्ये १० जून आणि वर्ष २०२३ मध्ये ११ जून या दिवशी पाऊस गोव्यात पोचला होता. वर्ष २०२४ मध्ये तो जवळपास वेळेत आला होता, तर वर्ष २०२५ मध्ये पाऊस अपेक्षेपेक्षा पुष्कळ लवकर पोचला होता. हवामान खात्याने पुढील आठवडाभर हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह सरी पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि ताशी ५० कि.मी. वेगाने वारे वहाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मौसमी पावसाला विलंब झाल्यास पिण्याच्या पाण्याची समस्या राज्यात उद्भवू शकते. काही जलसाठ्यांमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे पाणी असले, तरी पावसाला विलंब झाल्यास आणि सध्याच्या वाढत्या उष्णतेमुळे ते संपण्याची भीती आहे. प्रशासनाने ही नैसर्गिक आपत्ती ओळखून आताच काही उपाययोजना करणे अधिक श्रेयस्कर ठरेल, असे तज्ञांचे मत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi