Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हत्तींना जवळून पहाण्यासाठी कर्नाटक वन विभागाकडून प्रवेश शुल्क वसुली !

हत्तींना जवळून पहाण्यासाठी कर्नाटक वन विभागाकडून प्रवेश शुल्क वसुली !

मैसूरु (कर्नाटक) - जगप्रसिद्ध मैसुरू दसरा महोत्सवासाठी येथील राजवाड्यात हत्तींना जवळून पाहू इच्छिणार्‍यांना पैसे खर्च करावे लागणार आहेत. राजवाड्यात हत्तींना जवळून पहाण्यासाठी येणार्‍या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याच्या नावाखाली वन विभागाने प्रवेश शुल्क वसुली चालू केली आहे.

कोडगू येथील 'दुबारे कॅम्प'मध्ये एका हत्तीने नुकत्याच केलेल्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर विभागाने ही 'प्रमाणित कार्यपद्धत' (एस्ओपी - स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) लागू केल्याचे सांगितले जात आहे.

वन विभागाच्या नवीन नियमांनुसार या हत्तींना पाहू इच्छिणार्‍या १२ वर्षांवरील प्रौढांसाठी १०० रुपये आणि १२ वर्षांखालील मुलांसाठी ५० रुपये तिकीट शुल्क निश्चित करण्यात आले आहे. यासह हत्तींना पहाण्यासाठी अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. या अटींनुसार एका तिकिटावर केवळ २० मिनिटांसाठीच हत्तींना पहाण्याची अनुमती असेल. हत्तींपासून किंवा १०० मीटर बॅरिकेडचे (तात्पुरत्या अडथळ्यांचे) अंतर राखणे आवश्यक असून जवळ जाण्यास मनाई आहे. हत्तींसमोर सामाजिक माध्यमांसाठी 'रील्स' बनवणे, छायाचित्र काढणे किंवा हत्तींना खाऊ घालणे, यांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

हत्तींना पहाण्यासाठी पैसे वसूल करण्याच्या वन विभागाच्या या निर्णयावर नागरिक आणि पर्यटक यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. 'लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी बॅरिकेड्सची (तात्पुरत्या अडथळ्यांची) व्यवस्था करणे योग्य आहे; परंतु नागरिकांकडून पैसे उकळणे अत्यंत चुकीचे आणि निंदनीय आहे', अशा शब्दांत पर्यटकांनी संताप व्यक्त केला. यासह 'सामान्य पर्यटकांना तिकीट सक्तीचे करून अडवणारे वन विभागाचे कर्मचारी आणि पोलीस स्वतःचे नातेवाईक अन् ओळखीचे यांना मात्र हत्तींना पहाण्यासाठी निःशुल्क प्रवेश देत आहेत', असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला. ही तिकीट पद्धत तात्काळ रहित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi