Dailyhunt
हिंदु देवतांच्या अवमानाच्या संदर्भातही जागरूकता दाखवा !

हिंदु देवतांच्या अवमानाच्या संदर्भातही जागरूकता दाखवा !

फ्रान्सिस झेविअरवरील कथित आक्षेपार्ह विधानाविषयी 'दैनिक गोमंतक टी.व्ही.'वर नुकतेच एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हिंदु जनजागृती समितीचे गोवा राज्य प्रवक्ते डॉ. मनोज सोलंकी आणि शिक्षण अन् सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे युगांक नाईक हे सहभागी झाले होते.

या चर्चासत्राचे सूत्रसंचालन 'दैनिक गोमंतक टी.व्ही.'चे राजू नायक यांनी केले. या चर्चासत्राचा संक्षिप्त भाग येथे देत आहोत.

राजू नायक :सेंट फ्रान्सिस संदर्भात काही वाईट शब्द वापरले गेले, त्याचे पडसाद सतत उमटत येत आहेत. दोन्ही समाज आणि त्यांच्यातील जहाल घटक एकमेकांवर आरोप करत आहेत. आम्ही 'पीसफुल हार्मनी' (शांततापूर्ण सुसंवाद) म्हणतो; पण अशा राजकारणामुळे काय साध्य होते ? वर्षभर काही ना काही चालू असते. जाणूनबुजून अशा पद्धतीने दोन्ही समाजांतील भावना भडकवण्याचा प्रयत्न चालू असल्याचा अंदाज येतो. यामागे नेमका काय हेतू आहे ? जाणूनबुजून कलह निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे का ?, असे राजकारणात असे प्रश्न असतात.

डॉ. मनोज सोलंकी : सर्वप्रथम तुम्ही म्हटले की, हिंदु जनजागृती समिती आक्रमक आहे; पण मला स्पष्ट करायचे आहे की, आम्ही सनदशीर मार्गाने काम करतो. 'आक्रमक' हा शब्द वापरण्यापूर्वी आमची कामाची पद्धत समजून घेतली पाहिजे. आमचे अनेक कार्यक्रम होतात, आम्ही जनजागृती करतो. मडगाव प्रकरणी काही आरोप झाले होते; पण सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या दोन पूर्णपणे वेगळ्या संस्था आहेत. त्यांचे कार्य वेगळे आहे आणि आमचे वेगळे. आम्ही त्या त्या सूत्रांना पाठिंबा देत असतो; पण आम्ही दोन वेगवेगळ्या संस्था आहोत.

राजू नायक :अशा प्रकारे प्रक्षोभ निर्माण करण्याचा प्रयत्न हेतूपुरस्सर चालला आहे का ? खट्टर हा काहीतरी वादग्रस्त विधाने करून स्वतः प्रसिद्धीझोतात रहाण्याचा प्रयत्न करतो. असे जाणूनबुजून प्रक्षोभ निर्माण करण्याचे प्रयत्न अलीकडे वाढले आहेत का ?

डॉ. मनोज सोलंकी : आम्ही गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत आहोत. समाजात हिंदु धर्माविषयी अनेकदा वाईट वक्तव्ये केली जातात. म.फी. हुसेन यांनी हिंदु देवतांची नग्न चित्रे काढली, राजकीय नेत्यांनी धर्माला अपकीर्त केले; पण जेव्हा एका विशिष्ट धर्माच्या संदर्भात काही घडते, तेव्हा त्याला अधिक महत्त्व दिले जाते. हिंदु देवतांची विटंबना झाली, तेव्हा आता खट्टर प्रकरणी दिसून आली, तशी संवेदनशीलता का दिसली नाही ? आम्ही कुणाच्याही भावना दुखावल्या जाव्यात, असे कधीच काहीही केलेले नाही; पण हिंदु देवतांच्या अवमानाच्या संदर्भातही समाजाने तितकेच जागरूक राहिले पाहिजे. इतिहासाकडे पाहिले, तर हिंदु मंदिरांच्या विटंबनेविषयी अनेक गोष्टी समोर येतात. काही लोक जाणीवपूर्वक प्रतिक्रिया मिळावी म्हणून विधाने करतात. ही एक प्रकारची कार्यपद्धत बनली आहे.

युगांक नाईक : मला वाटते की, ही केवळ गौतम खट्टरची एकट्याची कृती नाही. गेल्या दोन दशकांतील राजकारण पाहिले, तर राजकीय पक्ष आणि सरकारे याकडे कसे पहातात ?, हे महत्त्वाचे आहे. गौतम खट्टर याच्या 'यूट्यूब वाहिनी'वरून त्याची बौद्धिक पातळी कळते. गोव्यासारख्या सुशिक्षित राज्यात त्याला व्यासपीठ मिळणे, हे सामान्य ज्ञानाच्या ('कॉमन सेन्स'च्या) विरुद्ध आहे. खट्टर काय बोलणार आहे ?, याची कुणाला कल्पना नव्हती, हे मान्य करणे कठीण आहे. अशा विधानांमुळे पोलिसांच्या यंत्रणेवर ताण येतो आणि पैसा व्यय होतो. गोव्यातील जीवन-मरणाचे प्रश्न बाजूला रहातात. अशा विधानांचा कुणाला तरी लाभ होतो. खट्टरला जी प्रसिद्धी हवी होती, ती सगळ्यांनी मिळून त्याला दिली.

डॉ. मनोज सोलंकी : हिंदु जनजागृती समितीचे मुख्य कार्य, म्हणजे हिंदूंमध्ये धार्मिक जागृती करणे, धर्मशिक्षण देणे आणि हिंदूंच्या समस्यांवर तोडगा काढणे. जर कायदा व्यवस्थित असता, तर अशा गोष्टी घडल्याच नसत्या. पोलिसांनी खट्टरवर कारवाई केली; पण दुसरीकडे जेव्हा हिंदु देवतांविषयी आक्षेपार्ह बोलले जाते, तेव्हा पोलिसांचे वागणे दुटप्पी असते. विशिष्ट धर्माच्या संदर्भातच तत्परता का दाखवली जाते ? हिंदु जनजागृती समिती हिंदूंच्या हितासाठी उभी रहाते. गोव्यात ७५ टक्के हिंदु असूनही शांतता आणि सलोखा टिकवून ठेवणे, हे सर्वांचे दायित्व आहे.

हिंदु समाज हा जगातील सर्वांत सहिष्णु समाज आहे. आमच्या पूर्वजांवर अत्याचार झाले, आमची मंदिरे पाडली गेली, तरीही आम्ही (हिंदू) अन्य पंथियांचा वारसा जपत आहोत. ही सहिष्णुतेची पराकाष्ठा आहे. तथापि जेव्हा आमचा अपमान होतो, तेव्हा आम्ही सनदशीर मार्गाने आमचा आवाज उठवतो. धर्मशिक्षण देणे, हे आमचे दायित्व आहे. आम्ही कधीही अवैध मार्गांचा वापर केलेला नाही. राज्यघटनेने दिलेल्या चौकटीत राहूनच आम्ही न्यायालय किंवा पोलीस यांच्याकडे दाद मागतो. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली धर्माचा अवमान खपवून घेतला जाणार नाही. 'वसुधैव कुटुम्बकम्' ही हिंदु धर्माची शिकवण आहे. आम्ही संपूर्ण जगाला कुटुंब मानतो; पण जेव्हा इतर काही लोक म्हणतात की, 'आमचाच देव श्रेष्ठ आहे', तेव्हा प्रश्न निर्माण होतो. ५०० वर्षांपूर्वीचे अत्याचार आणि इतिहास पुन्हा मांडला जातो, तेव्हा त्याचे पडसाद उमटतात. सेंट फ्रान्सिस झेविअर संदर्भातील ऐतिहासिक तथ्ये आणि लोकांच्या भावना या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

राजू नायक : डॉ. सोलंकी, तुम्ही हिंदूंच्या क्षमायानेचा विषय काढला, मग हिंदु समाजाने दलितांची किंवा बहुजन समाजाची क्षमा का मागू नये ? शेकडो वर्षे त्यांच्यावर अन्याय झाला आहे.

डॉ. सोलंकी : हिंदु धर्माची व्याख्या फार व्यापक आहे. वर्णव्यवस्था ही गुण आणि कर्म यांवर आधारित होती. गीतेत म्हटले आहे की, मनुष्याच्या गुणांप्रमाणे त्याचे वर्ण ठरतात. जो ज्ञानी आहे तो ब्राह्मण, जो रक्षण करतो तो क्षत्रिय. हे जन्मावर आधारित नव्हते. वाल्मीकिऋषींचे उदाहरण आपल्यासमोर आहे. सध्या हिंदु समाजात फूट पाडण्याचे काम राजकीय कारणांसाठी केले जात आहे. यावर 'धर्मशिक्षण देणे', हा एकमेव उपाय आहे. जेव्हा व्यक्तीला तिच्या धर्माविषयी योग्य माहिती मिळेल, तेव्हाच सलोखा टिकून राहील. (विषयाशी संबंधित प्रश्न न विचारता भलताच प्रश्न विचारून चर्चासत्राची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न करणार्‍या राजू नायक यांच्यासारखे सूत्रसंचालक कधीतरी निष्पक्ष चर्चासत्र आयोजित करू शकतील का ? त्यांचा चर्चासत्राचा हेतू काय होता ?, हेही त्यांच्या प्रश्नांवरून दिसून येते. अशी एकांगी पत्रकारिता करणार्‍यांना समाज चांगलाच ओळखून आहे ! - संपादक)

युगांक नाईक : गोव्याच्या मुक्तीलढ्यात ख्रिस्ती समाजानेही मोठे योगदान दिले आहे. पोर्तुगिजांच्या विरोधात ४० हून अधिक बंडे झाली. त्यामुळे ख्रिस्ती समाजाने कुणाची क्षमायाचना करण्याची आवश्यकता नाही, त्यांनी त्यांचा राष्ट्रवाद सिद्ध केला आहे. सेंट फ्रान्सिस झेविअर यांना 'गोंयचो सायब' ही पदवी चर्चने किंवा सरकारने दिलेली नाही, ती येथील लोकांच्या भावनेतून आली आहे. (असंख्य हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या, तसेच मंदिरे पाडून चर्च उभारणार्‍या झेविअरला 'गोव्याचा साहेब' म्हणणे, हा १०० कोटी हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, तसेच हा गोव्याच्या मुक्तीसाठी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचाही घोर अवमान आहे. झेविअरने हिंदूंवर अनन्वित अत्याचार करण्यासाठी इन्क्विझिशन (धर्मच्छळ) लादण्याची पोर्तुगालच्या तत्कालीन राजाकडे मागणी केली, त्याविषयी युगांक गप्प का ? कि त्यांना हे अत्याचार मान्य आहेत ? - संपादक)

राजू नायक : गोवा हे आता वैचारिक संघर्षाचे मैदान बनत चालले आहे. वर्ष २०१० पासून काही शक्ती गोव्याला प्रयोगशाळा बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण सर्वांनी एकत्र येऊन धार्मिक सलोखा कसा टिकवता येईल ?, यावर विचार केला पाहिजे. या चर्चेतून लोकांनी योग्य तो निष्कर्ष काढावा आणि शांततेच्या मार्गाने पुढे जावे, हीच अपेक्षा आहे. (गोव्यात तालिबानचा प्रवक्ता येऊन उघडपणे भाषण करून गेला, अलीकडेच काही आतंकवादी गोव्यात रहात असल्याचे उघड झाले. एका पाद्र्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला, अशा राष्ट्रविघातक घटनांचा उल्लेख नायक कदापि करत नाहीत, हे लक्षात घ्या. अशा घटनांविषयी त्यांना कधी चर्चासत्रे का घ्यावीशी वाटत नाहीत ? - संपादक)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi