(स्ट्रेट म्हणजे सामुद्रधुनी, म्हणजेच दोन मोठ्या जलमार्गांना जोडणारा अरुंद जलमार्ग)
वॉशिंग्टन (अमेरिका) - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी स्वत:च्या 'ट्रुथ सोशल' या सामाजिक माध्यमावर स्वत:चीच एका जुनी पोस्ट पुन्हा प्रसारित (रिपोस्ट) केली आहे.
त्यामध्ये एक चित्र आहे, ज्यावर 'स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ'चे नाव पालटून त्याचा उल्लेख 'स्ट्रेट ऑफ ट्रम्प' असा केला आहे. गंमत म्हणजे ज्या वापरकर्त्याची मूळ पोस्ट ट्रम्प यांनी प्रसारित केली, त्या वापरकर्त्याने ती पोस्ट आधीच पुसून टाकली ('डिलीट' केली) आहे.
अमेरिकेने हॉर्मुझवर नाकाबंदी केल्याने इराणच्या अडचणी आधीच वाढल्या आहेत. त्याला स्वत:चेच तेल आणि अन्य साहित्य निर्यात करण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. ट्रम्प यांचा दावा आहे की, बाँब फेकून नव्हे, तर अशा नाकाबंदीमुळे इराण सुतासारखा सरळ होईल आणि स्वत:चा अणू कार्यक्रम बंद करेल. ट्रम्प पुढे म्हणाले की, बाँबफेकीपेक्षा नाकाबंदी ही कितीतरी अधिक प्रभावी ठरते. इराण अत्यंत बिकट परिस्थितीत अडकला असून त्याचा श्वास कोंडला जात आहे. त्याची परिस्थिती आणखीच बिघडणार आहे.
इराणच्या ऊर्जा प्रकल्पांचे कामकाज ठप्प होण्याच्या उंबरठ्यावर आले असून तेलाची निर्यात करता येत नसल्यामुळे तेथील सरकारवर प्रचंड दबाव आला आहे, असा दावाही ट्रम्प यांनी केला.

