Dailyhunt
कागदपत्रे सादर न केल्यास ५० सहस्र लाभार्थी 'गृह आधार'ला मुकणार

कागदपत्रे सादर न केल्यास ५० सहस्र लाभार्थी 'गृह आधार'ला मुकणार

णजी, ३ मे (वार्ता.) - मे अखेरपर्यंत अपेक्षित कागदपत्रे सादर न केल्यास ५० सहस्र लाभार्थी 'गृह आधार' योजनेच्या लाभापासून वंचित रहाणार आहेत. संबंधित लाभार्थ्यांनी मे अखेरपर्यंत त्यांचे जीवन प्रमाणपत्र ('लाईफ सर्टीफिकेट) आणि वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र सादर न केल्यास गोवा सरकारचे महिला आणि बाल विकास खाते संबंधित लाभार्थींची नावे लाभार्थी सूचीमधून रहित करणार आहे.

महिला आणि बाल विकास खात्याने संबंधित लाभार्थ्यांना अपेक्षित कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटिसा पाठवल्या आहेत. खात्याने संबंधित लाभार्थ्यांना मासिक आर्थिक साहाय्य देणे तुर्तास स्थगित ठेवले आहे.

एखाद्या प्रकरणी लाभार्थीचे निधन झालेले असेल आणि योजनेचे आर्थिक साहाय्य जर अधिकोषात पडून असेल, तर ती रक्कम परत मिळवण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया केली जाणार असल्याचे खात्याने कळवले आहे. गोवा सरकारची 'गृह आधार' योजना वर्ष २०१६ पासून प्रारंभ झाली आहे आणि वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर या योजनेच्या अंतर्गत गृहिणींना मासिक आर्थिक साहाय्य दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पती आणि पत्नी यांचे एकूण वार्षिक उत्पन्न ३ लक्ष रुपयांपेक्षा अधिक असू नये. सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ घेणारी आणि मूल असलेली विधवा महिला 'गृह आधार' योजनेचाही लाभ घेऊ शकते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi