कळंगुट, २३ ऑक्टोबर (वार्ता.) - कळंगुट पंचायतीने अस्वच्छ परिस्थितीत व्यवसाय करणार्या आणि पदपथांवर अतिक्रमण करणार्या रस्त्यांवरील विक्रेत्यांविरुद्ध कारवाई तीव्र केली आहे. यासमवेतच सरपंचांनी मद्यविक्रीची दुकाने सकाळी ७ वाजता चालू होऊन रात्री उशिरापर्यंत उघडी रहात असल्याच्या प्रकारावर चिंता व्यक्त केली आहे.
याविषयी पत्रकारांशी बोलतांना सरपंचांनी मांडलेली सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत.
१. गेल्या काही दिवसांपासून पंचायतीने कळंगुट आणि बागा परिसरातील विविध ठिकाणी पहाटेच्या वेळी विशेष मोहीम राबवली. यामध्ये पदपथ आणि सार्वजनिक जागा यांवर इडली-डोसा-सांबार, फळे आणि इतर खाद्यपदार्थ विकणारे यांच्यावर कारवाई करण्यात आली.
२. काही विक्रेत्यांनी पदपथांवर टेबल आणि आसंद्या मांडल्यामुळे नागरिकांच्या येण्या-जाण्याला अडथळा निर्माण होत होता. पंचायतीने संबंधित विक्रेत्यांना लेखी नोटिसा बजावल्या असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. या कारवाईच्या वेळी काही विक्रेत्यांच्या वस्तूही जप्त करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे.
३. काही स्थानिक दुकानमालक त्यांची जागा इतरांना भाड्याने देतात आणि ते भाडेकरू कोणत्याही देखरेखीविना तिथे व्यवसाय चालवतात, तसेच स्थानिक पातळीवरील काही व्यवस्थांनुसार व्यवसाय करण्याची अनुमती मिळालेली खाद्यविक्रीची ठिकाणेही पुढे इतरांना भाड्याने दिली जात आहेत.
४. स्वच्छतेच्या समस्या सोडवण्यासाठी आणि पर्यटनस्थळ म्हणून कळंगुटची प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्यासाठी स्थानिकांनी पंचायतीला सहकार्य करावे. वाढदिवसाच्या मेजवान्या आणि इतर कार्यक्रम यांनंतर होणार्या कचर्यामुळे समुद्रकिनार्याच्या काही भागांची अवस्था बिकट झाली आहे. पंचायत प्रतिनिधींनी स्वतःहून गौरावाडो, तिबाईवाडो, मड्डावाडो, खोबरावाडो, उमटावाडो आणि साउंटवाडो यांसारख्या अनेक प्रभागांमध्ये स्वच्छता मोहिमा राबवल्या आहेत.
५. 'टिटोज लेन'आणि परिसरातील मद्यविक्रीची काही दुकाने सकाळी ७ वाजताच उघडतात, तर काही दुसर्या दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत चालू असतात. अशा प्रकारे व्यवसाय चालवण्यासाठी त्यांच्याकडे अधिकृत अनुज्ञप्ती आहे का ? उत्पादन शुल्क विभागाने या नियमांच्या उल्लंघनाची चौकशी करावी. या विभागाने कळंगुटमध्ये येऊन या आस्थापनांची पडताळणी करावी.
६. व्यवसायांच्या कामकाजाच्या वेळीच कार्यवाही करण्याचे उत्तरदायित्व पोलीस विभागाचे आहे. तथापि अनुमाने १०० पोलिसांच्या संमत संख्येच्या तुलनेत तिथे ३५ हून अल्प पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. यामुळे नियमांची प्रभावी कार्यवाही करणे कठीण होत आहे.
७. रस्त्यावरील फेरीवाले, अनुज्ञप्ती नियमांचे कथित उल्लंघन आणि कचरा व्यवस्थापनातील त्रुटी यांमुळे गोव्यातील एका प्रमुख पर्यटनस्थळाची प्रतिमा मलिन होत आहे.
या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पंचायत, उत्पादन शुल्क विभाग (एक्साईज डिपार्टमेंट), पोलीस आणि इतर संबंधित प्राधिकरणांमध्ये अधिक चांगला समन्वय असणे आवश्यक आहे.

