Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Kanpur Aircraft Crash : कानपूर येथे प्रशिक्षण विमान कोसळले : वैमानिक आणि प्रशिक्षणार्थी ठार

Kanpur Aircraft Crash : कानपूर येथे प्रशिक्षण विमान कोसळले : वैमानिक आणि प्रशिक्षणार्थी ठार

कानपूर (उत्तरप्रदेश) - शहरात २७ ऑगस्ट या दिवशी सकाळी प्रशिक्षण विमान कोसळून वैमानिक (पायलट) आणि प्रशिक्षणार्थी यांचा मृत्यू झाला. वैमानिक सचिन भाटिया (रहाणार गुजरात) आणि प्रशिक्षणार्थी अभिषेक पुजारी (रहाणार कर्नाटक), अशी त्यांची नावे आहेत.

मृत पायलट सचिन भाटिया यांना अनुमाने ३ सहस्र घंट्यांचा उड्डाणाचा अनुभव होता. अपघातामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची चौकशी चालू करण्यात आली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे पथकही घटनास्थळी पहाणी करून विमानाच्या दुर्घटनेमागील कारणांचा शोध घेणार आहे.

गंगा बॅरेजजवळील नत्थापूरवा गावाच्या परिसरात सकाळी ११.५० वाजता हा अपघात झाला. अनुमाने १०० फूट उंचीवर असतांना विमान अचानक डगमगले आणि वैमानिकाचा त्यावरील ताबा सुटला. त्यामुळे विमान झाडांना धडकून भूमीवर कोसळले आणि त्यानंतर त्याचा भीषण स्फोट झाला. यात वरील दोघे जण घायाळ झाले. स्थानिक नागरिकांनी तातडीने साहाय्यकार्य चालू केले. अनुमाने १२.१५ वाजता पोलीस आणि प्रशासन यांचे पथक घटनास्थळी पोचले. विमानातील दोघांना रुग्णालयात भरती करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघातानंतर घटनास्थळावर विमानाचे अवशेष विखुरले होते. काही प्रत्यक्षदर्शी व्हिडिओ समोर आले असून त्यात विमान कोसळल्यानंतर झालेल्या हानीचे दृश्य दिसत आहे. 'कॉकपिट'जवळ एक पायलट अडकलेला, तर दुसरा व्यक्ती विमानापासून काही अंतरावर रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याचे दिसून येते. विमानाची एक सीटही तुटून बाहेर पडली होती.

कानपूरचे पोलीस आयुक्त रघुबीर लाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'टेक्नम' या आस्थापनाच्या ४ आसनी विमानाने चकेरी येथील 'गर्ग एव्हिएशन ट्रेनिंग सेंटर'मधून सकाळी ११.३० वाजता प्रशिक्षणासाठी उड्डण केले. उड्डाणानंतर अवघ्या २० मिनिटांनी केंद्रापासून सुमारे ३९ किलोमीटर अंतरावर असलेल्या नत्थापूरवा गावाजवळ ते कोसळले.'

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi