पणजी, ३ ऑगस्ट (वार्ता.) - कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून आरोपी अझरुद्दीन आची उपाख्य असरू हा भ्रमणभाष संचाचा वापर करून 'व्हॉट्सॲप' आणि 'युपीआय' यांच्या माध्यमांतून देशभरात अमली पदार्थांचा व्यवसाय चालवत होता, अशी माहिती राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली आहे.
एका अमली पदार्थ व्यवहाराच्या प्रकरणी हल्लीच आरोपी अझरुद्दीन आची याची गुन्हे अन्वेषण शाखा अन्वेषण करत होती. या अन्वेषणामध्येच आरोपी अझरुद्दीन आची उपाख्य असरू याने ही माहिती गुन्हे अन्वेषण विभागाला दिली.
गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका अमली पदार्थ व्यवहाराच्या प्रकरणी दोष सिद्ध झालेला आरोपी अझरुद्दीन आची उपाख्य असरू कारागृहात शिक्षा भोगत आहे. तो 'व्हॉट्सॲप'च्या माध्यमातून अमली पदार्थांचा पुरवठा आणि वितरण करणारे यांच्याशी जोडला गेला होता. या वेळी व्यवहार 'युपीआय' किंवा रोख रक्कम यांद्वारे केला जात होता. अमली पदार्थांच्या खरेदीचे सर्व व्यवहार कारागृहातील आरोपी आणि देशभरातील अमली पदार्थ व्यावसायिक यांच्यात थेट संबंध न येता चालवला जाता होता. आरोपी कारागृहातूनच अमली पदार्थ कुठे साठवून ठेवायचे आणि ते कुठे वितरण करायचे, याची माहिती 'व्हॉट्सॲप'द्वारे किंवा थेट फोन करून संबंधितांना देत होता. (असे आहे, तर त्याला कारागृहात डांबून काय लाभ झाला ? उलट अधिक सुरक्षितपणे त्याला कारागृहातून व्यवहार करता आला. हे संतापजनक आहे ! - संपादक)
न्यायालयाने फटकारल्यावर आणि आताच्या घटनेनंतर कारागृह प्रशासन 'भ्रमणभाष जॅमर' यंत्रणा बसवण्याच्या विचारात
हल्लीच मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने कारागृह प्रशासनाला कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात वारंवार बंदीवानांची पडताळणी केली जात असूनही बंदीवान (कैदी) अनधिकृतपणे भ्रमणभाषचा वापर कसा करतात?, असा प्रश्न विचारून फटकारले होते. कारागृहातील अधिकारी पडताळणी वरचेवर करतात का ? याचे अन्वेषण करून संबंधितांचे दायित्व निश्चित करावे, असा आदेशही न्यायालयाने दिला होता. या वेळी कारागृह प्रशासनाला 'रोबोस्ट फोन जॅमर' यंत्रणा किंवा 'सेल्यूलर इन्सेप्शन सिस्टम' बसवणे, बंदीवान प्रवेश करत असलेल्या 'कॉऊंटरवर' सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, कारागृहातील अनधिकृत भ्रमणभाष चार्जिंग पॉईंट्स हटवणे आणि भ्रमणभाष चार्जिंग यंत्रणा कारागृहात कशी निर्माण झाली, याचे अन्वेषण करण्यास सांगितले होते.
आताच्या घटनेनंतर कारागृह प्रशासने भ्रमणभाष संच वापरण्यावर आळा घालण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान वापरण्याचा विचार करत आहे. यामध्ये भ्रमणभाष जॅमर (मोबाईल जॅमर) बसवणे आणि 'टॉवर हार्माेनियस कॉल ब्लॉकिंग सिस्टम' ही यंत्रणा कार्यान्वित करणे यांचा विचार करत आहे.

