कोल्हापूर - शहरातील 'ई' प्रभागातील 'सीटी सर्व्हे क्रमांक २५९ 'अ' मधील ५७ एकर भूमीवर चालू असलेल्या अनधिकृत खरेदी-विक्री आणि अवैध हस्तांतरणाविरुद्ध शासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
यातील महापालिका, शाळा आणि दूरसंचार व्यवस्थापक यांची भूमी वगळून 'अमेरिकन मिशन' बंगल्यासाठी भाडेपट्टीवर तात्पुरत्या स्वरूपात दिलेली ४८ एकर शासकीय भूमी प्रशासनाने पुन्हा कह्यात घेण्याची प्रक्रिया चालू केली आहे. 'रेडी रेकनर'नुसार (महसूल विभागाने ठरवून दिलेले कोणत्याही मालमत्तेचे किमान बाजारमूल्य) या भूमीचे बाजारमूल्य अनुमाने ५०० कोटी रुपये होते. काही दिवसांत ही जागा कह्यात घेण्याची प्रक्रिया चालू करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
१. या प्रभागामधील 'अ' या गट क्रमांकामधील २० सहस्र चौरस मीटर (५७ एकर भूमी) शासनाने 'अमेरिकन मिशन' बंगल्यासाठी काही अटींच्या आधारे भाडेपट्टीवर दिली होती. असे असतांना सक्षम प्राधिकरणाची अनुमती न घेता या भूमीचे १ ते ९ पोटहिस्से करून अनधिकृत विक्री आणि हस्तांतरण करण्यात आले. हा अपप्रकार समोर आल्यानंतर ती जागा शासनाच्याच नियंत्रणातील 'वर्ग-२' ची भूमी असल्याचे सिद्ध झाले असून विनाअनुमती झालेले सर्व व्यवहार अवैध ठरवण्यात आले आहेत.
२. या भूमीवर अनुमाने ५ एकर भूमीवर झोपडपट्टी आणि अनधिकृत अतिक्रमणे आहेत. यावर शासकीय धोरणानुसार पुढील कारवाई केली जाईल, तसेच अवैध वाटप आणि हस्तांतरण करणार्यांवर कालबद्ध पद्धतीनुसार कारवाई करण्याचे निर्देश तहसीलदार अन् संबंधित अधिकारी यांना देण्यात आले आहेत.

